Gadchiroli Chimur । देशात लोकसभा निवडणूक येत्या १९ तारखेपासून होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात होणार आहे. यातील गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. गडचिरोली चिमूर मतदारसंघ तसा पहिला तर अत्यंत दुर्गम आणि विकासापासून कोसो दूर असणारा मतदारसंघ आहे. गडचिरोलीतील 3, चंद्रपूरमधील 2 आणि गोंदिया जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे मागास जिल्ह्यांच्या यादीत समावेश आहे. गडचिरोली चिमूर मतदारसंघ हा नक्षलवादी बहुल प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा नक्षलवादच त्याठिकाणच्या विकासामधील मोठा अडथळा आहे. याठिकाणी आदिवासी लोकांचीच संख्या जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी कायद्याच्या अखत्यारीत राहून गोष्टी करण्यात येतात. त्यात वन्यजीव संवर्धन कायद्यामुळे इथे सोयीसुविधा अजूनही पोहचल्या नाहीत. गडचिरोली मतदारसंघातील विधानसभा जागा Gadchiroli Chimur । या मतदारसंघात आमगाव,आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी, आणि चिमूर या सहा विधासभांचा समावेश आहे. याठिकाणी विधानसभेत देखील काँग्रेस विरुद्ध भाजप असाच थेट होता. मागच्या विधानसभेत आमगावमध्ये काँग्रेसचे सहसराम कोराटे आणि ब्रह्मपुरीत विजय वडेवट्टीवार यांचा विजय झाला होता. तर ३ विधानसभा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात आरमोरी,गडचिरोली आणि चिमूरचा समावेश आहे. याठिकाणी अनुक्रमे कृष्णा गजबे, देवराव होळी आणि कीर्तिकमार बंगाडिया हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची एकच जागा असून याठिकाणी राष्ट्रवादीचे एवढे प्राबल्य नसल्याचे दिसून येते. मतदारसंघाचा इतिहास अन् सध्याची राजकीय परिस्थिती Gadchiroli Chimur । मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2008 मध्ये हा गडचिरोली चिमूर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. राजकीयदृष्ट्या दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता या मतदारसंघात भाजपचं कमळच फुललेलं दिसतं. कारण गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 2009 ला पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली. पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांनी भाजपच्या अशोक नेते यांचा 28 हजार मतांनी पराभव केला. पुढे 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसनं कोवासे यांचं तिकीट कापलं आणि नामदेव उसंडी यांना उमेदवारी दिली. यावेळीही सामना हा भाजपच्या अशोक नेते यांच्यासोबत झाला.कोवासे यांचं तिकीट कापल्याची नाराजी कुठंतरी होतीच. त्याचा फटका काँग्रेसला बसला आणि मोदी लाटेवर स्वार होत अशोक नेते खासदार म्हणून दिल्लीत गेले. 2019 ला देखील डॉ. नामदेव किरसान यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं. पण, काँग्रेसने उसेंडी यांना पसंती देत पुन्हा अशोक नेते यांच्याविरोधात लोकसभेच्या मैदानात उतरवलं. उसेंडी यांनी दीड लाखांनी नेतेंची लीड कमी केली. तरीही उसेंडी यांना पराभव पत्करावा लागला. आता 2024 च्या निवडणुकीत उसेंडी इच्छूक होते. पण, काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना तिकीट दिलं, तर भाजपकडून सध्याचे खासदार अशोक नेते लोकसभेच्या रिंगणात आहेत.त्यामुळे काँग्रेसने नामदेव किरसान यांच्यावर ठेवलेला विश्वास ते सार्थ ठरवतात कि अशोक नेते पुन्हा एकदा हॅटट्रिक करणार हे मात्र येत्या 4 जूनला ठरणार आहे.