जी-20 शिखर परिषद: मोदी यांची अनेक देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा

रोम – इटलीची राजधानी रोम इथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित काही राष्ट्र प्रमुखांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि मोदी यांच्यात शनिवारी द्विपक्षीय चर्चा झाली. भारत-फ्रान्स यांच्यातील व्यापक सामरिक भागीदारीच्या सद्यस्थितीविषयी दोन्ही नेत्यांनी या बैठकीत समाधान व्यक्त केले.
तसेच, युरोपीय महासंघाने सप्टेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध केलेल्या हिंद-प्रशांत धोरणाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. हिंद-प्रशांत धोरणात परस्पर सहकार्य करण्याविषयीची कटीबद्धता दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. तसेच, या संपूर्ण प्रदेशात मुक्त, खुली आणि नियम-आधारित व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी नवे अभिनव मार्ग शोधण्यावर या चर्चेत सहमती व्यक्त झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे पंतप्रधान ली स्शेन हूंग यांच्याशीही चर्चा झाली. कोविड साथीनंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. यावेळी उभय नेत्यांमध्ये हवामान बदलाच्या संकटाचे जगावर होणारे परिणाम आणि लसीकरणाच्या प्रयत्नांना गती देऊन आणि महत्वाच्या औषधांचा पुरवठा करण्याविषयी देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची भेट घेतली.





