पुणे -आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची असलेली “जी-20′ देशांची परिषद आयोजित करण्याचा मान यंदा भारताला मिळाला आहे. त्यातील काही सभा या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी अधिसभेचा अहवाल सादर करताना ही माहिती दिली. या अधिसभेला प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्यासह सर्व नवनिर्वाचित अधिसभा सदस्य उपस्थित होते.
“जी-20′ परिषदेतील अनेक बैठका या भारतभरात होणार आहे. त्यातील काही बैठका या विद्यापीठात घेण्याचे नियोजन आहे. यासाठी विद्यापीठाशी संलग्न आठ लाख विद्यार्थ्यांसाठी “जी-20′ ची माहिती देणारे विशेष व्याख्यान जानेवारीत आयोजित केले जाईल. यासाठी गेले काही दिवस केंद्रीय समित्यांमधील मंडळींशी बैठका सुरू असल्याचेही डॉ.काळे यांनी सांगितले.
विद्यापीठाचा मागील सहा महिन्यांचा कामाचा अहवालही सादर करण्यात आला. या काळात विद्यापीठाने अमेरिकेतील अनेक नामांकित विद्यापीठांसोबत व शिक्षण संस्थांसोबत सामंजस्य करार केले. यातून नवे अभ्यासक्रम, परदेशी शिक्षणाची संधी, संशोधन या बाबी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या आदिवासी जनजाती आयोगाच्या कार्यक्रमात विद्यापीठाने सहभाग नोंदवला. याशिवाय मागील काही महिन्यात विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमबजावणीसाठी अनेक कार्यक्रम घेतले आहेत. विद्यापीठात सुरू असणारे संशोधन तसेच अनेक उपक्रमांची माहितीही डॉ.काळे यांनी यावेळी दिली. “जी-20′ परीषद समजून घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचेही डॉ.काळे यांनी सांगितले.
या परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थी आणि नवउद्योजकांना फायदा होऊ शकेल अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे, विद्यापीठ स्तरावर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना अधिसभा सदस्यांनी केली. यावेळी डॉ.संजीव सोनवणे यांनी विद्यापीठाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करत विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. डॉ.प्रफुल्ल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.