शेतकऱ्याचे पशुप्रेम : आवडत्या बैलाचा केला “तेरावा विधी’
नाणे मावळ – कार्तिकी एकादशीनिमित्त अनेक वारकरी आळंदीला जात असतात. यावर्षी मावळ तालुका दिंडी समजाच्या पालखीला राजा व निशाण्याही बैलजोड मिळाली होती.
संत तुकाराम महाराज झाड वाकसई ते आळंदी असा दिंडीचा मार्ग असतो. यावर्षी दिंडीतील महाराजांच्या पादुका व मूर्तीचा भार आपल्या खांद्यावर घेणाऱ्या राजा व निशाण्या पैकी निशाण्या नावाच्या बैलाचा परतीच्या प्रवासात आकस्मित मृत्यू झाला. निशाण्याच्या आकस्मित मृत्यूने वारकऱ्यांनी शोक व्यक्त करून निशाण्याचे मालक व मावळ तालुक्याचे माजी सभापती राजाराम गणू शिंदे यांना निशाण्याचा तेरावा विधी करण्याचा आग्रह धरला होता.
निशाण्याच्या आकस्मित मृत्यूनंतर त्याचा तेरावा विधी शिंदे पाटील फार्महाऊस, कुसगाव रोड कामशेत याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज ठाकर यांनी प्रवचन केले. मावळ तालुक्यातील असंख्य वारकऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मावळ तालुका दिंडी समाजातील ज्येष्ठ वारकरी व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.वारकऱ्यांच्या वतीने हभप दशरथ महाराज मानकर (मुळशी) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन माजी सभापती राजाराम शिंदे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुरेश शिंदे, पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिदास शिंदे, शिंदे परिवार व कमशेत ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.