रेडा – इंदापूर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर या मृतांवर इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे साथी प्रा. कृष्णा ताटे, साथी गफूर सय्यद, आकाश गावडे, सूरज मिसाळ, अजिंक्य ताटे, अमोल खराडे, अजय रजपुत आदी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार करण्यात आले.
सेंटरमध्ये गुरुवार (दि.30) उपचार घेत असलेल्या एका अंदाजे 70 वर्षीय पुरुष, (दि.31) पहाटे 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (दि.30) मृत झालेल्या व्यक्तीला मुखाग्नी तहसीलदार सोनाली मेटकरी व साथी गफुर सय्यद यांनी दिला. महिलेचा अंत्यविधीही करण्यात आला. यावेळी प्रशासकीय यंत्रणा व मृताचे कुटुंबीयही उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, वैद्यकिय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशवे, डॉ. सुहास शेळके, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासह नागरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.