संत सावता महाराज समाधी मंदिर विकासासाठी 150.23 कोटींचा निधी मंजूर, चिंबळीत उत्साह

चिंबळी : संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथील समाधी मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत १५०.२३ कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ही बाब अत्यंत आनंददायक व अभिमानास्पद असल्याचे श्री संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व चिंबळी येथील हभप साखरचंद महाराज लोखंडे यांनी व्यक्त केले.
चिंबळी, आळंदी, कुरुळी, मोशी व परिसरातील भाविक व वारकरी बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. खेड बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग बनकर तसेच ग्रामस्थांनी शासनाचे विशेष आभार मानले आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आमदार योगेश टिळेकर यांचे पंचक्रोशीतील समाजबांधवांनी आभार व्यक्त केले आहेत.
सन २०२४ मध्ये श्री क्षेत्र अरण येथे पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘अ’ वर्ग दर्जाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची घोषणा केली होती. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच या घोषणेची पूर्तता करत निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे श्री क्षेत्र अरणच्या सर्वांगीण विकासाला नवे रूप प्राप्त होणार असल्याचे लोखंडे महाराज यांनी नमूद केले.





