केंद्राशासनाकडून 521 कोटींचा निधी

पुणे – केंद्र शासनाकडून शालेय पोषण आहार योजनेसाठी 521 कोटी रुपयांच्या निधीचा हप्ता मिळालेला आहे. आता राज्य शासनाकडील निधी हिस्सा मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.
राज्यातील 86 हजार शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या 1 कोटी 6 लाख विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळतो. या योजनेसाठी वर्षभरासाठी 1 हजार 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. यात केंद्राकडून 1 हजार 100 कोटी रुपये, तर राज्य शासनाकडून 700 कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित धरला होता.
केंद्र शासनाकडून 599 कोटींचा निधी पूर्वीच मिळाला आहे. राज्य शासनाकडून 239 कोटींचा निधी मिळाला आहे. केंद्र शासनाकडे उर्वरित निधीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्याकडून तो मिळालाही आहे. आता राज्य शासनाकडून निधी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. येत्या 31 मार्चपर्यंत निधी मिळून तो खर्च करणे गरजेचे आहे.





