पुणे -राज्य शासनाने पुण्याच्या हद्दीलगतची 23 गावे 2021 मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट झाली आहेत. पायाभूत सुविधा व नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी या गावांचा महानगरपालिकेत समावेश केला आहे. 34 गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महापालिकेत समाविष्ट 23 गावांच्या पायाभूत सोयी सुविधांच्या गैरसोयीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावांपैकी 11 गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महापालिकेमार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच 23 गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत तयार करण्यात येत आहे.
1 हजार 200 कोटींचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. या गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन योजना व इतर सर्व योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या गावांना सर्व मूलभूत सोयी देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिकेत आहे. लोकसंख्येचा विचार करून नगरसेवकांची संख्या ठरविण्यात येते. नगरसेवकांच्या संख्येबाबत सर्वंकष विचार करण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितले.