Pune District : पौड तहसील कार्यालयासाठी 7.40 कोटींचा निधी; आमदार शंकर मांडेकर यांची माहिती
Pune District : आमदार मांडेकर म्हणाले की, पौड येथे नवीन तहसील कार्यालयाचे बांधकाम सुरू असून मंजूर निविदेनुसार ठेकेदाराकडून काम करण्यात येत आहे.

पौड : येथील नवीन तहसील कार्यालय इमारतीच्या उर्वरित कामासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून 7 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
आमदार मांडेकर म्हणाले की, पौड येथे नवीन तहसील कार्यालयाचे बांधकाम सुरू असून मंजूर निविदेनुसार ठेकेदाराकडून काम करण्यात येत आहे. मात्र निधीअभावी उर्वरित काम काही काळ ठप्प झाले होते. आता निधी उपलब्ध झाल्याने पुन्हा कामाला वेग आला असून उर्वरित काम चार महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 2059.49 चौ.मी. असून आरसीसी फ्रेम्ड स्ट्रक्चर, गिलावा, फरशी, खिडक्या, ग्रील, आर/ई वॉल, टेरेस वॉटरप्रूफिंग, पाण्याची अंडरग्राउंड टाकी आदी प्रमुख कामांचा मोठा भाग पूर्ण झाला आहे. तर उर्वरित सोलर रूफटॉप, इलेक्ट्रिफिकेशन, फर्निचर, लिफ्ट, एसी, लँडस्केपिंग, सीसीटीव्ही, स्ट्रीट लाईट्स, ए.बी. रूम्स, डी.जी. सेट आदी कामांसाठी निधीअभावी काम रखडले होते.
ही इमारत मुळशी तालुक्याच्या प्रशासकीय कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, या कामाची पाहणी आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार शरद ढमाले, तहसीलदार विजयकुमार चोबे, उपसभापती दगडूकाका करंजावणे, नायब तहसीलदार मोहन जोगदंड, शाखा अभियंता राजेंद्र चौधरी तसेच इतर पदाधिकार्यांनी केली.





