मंचर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढत्या मानव-बिबट संघर्षाने गंभीर रूप धारण केले आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि मानवी वस्त्यांमधील त्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील काही वर्षांत झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. अलीकडेच झालेल्या हल्ल्यांत एका 13 वर्षीय चिमुरड्याचा, तसेच एका वृद्ध महिलेसह एका लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीची दखल घेत मानव-बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी आणि बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तब्बल 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. या निधीसाठी आंबेगावचे आमदार तथा माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निधी मंजूर केला. यापूर्वीही जिल्हा नियोजन मंडळामार्फत 2 कोटींचा निधी पिंजरे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता, त्यानुसार संबंधित आदेश जारी करण्यात आले आहेत. या मंजूर निधीतून जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात 20 विशेष रेस्क्यू टीम स्थापन केल्या जाणार आहेत. प्रत्येक टीममध्ये प्रशिक्षित नेमबाज, शोधक, ट्रँक्युलायझिंग गन, रेस्क्यू वाहने, अत्याधुनिक कॅमेरे आणि पिंजरे यांसह आवश्यक साधनसामग्रीचा समावेश असेल. या मोहिमेत 500 पिंजरे, 20 ट्रँक्युलायझिंग गन, 500 ट्रॅप कॅमेरे, 250 लाईव्ह कॅमेरे, 500 हाय-पॉवर टॉर्च, 500 स्मार्ट स्टिक, 20 वैद्यकीय किट्स अशा अत्याधुनिक उपकरणांचा वापर होणार आहे. प्रत्येक टीममध्ये 5 ते 6 प्रशिक्षित सदस्य असतील. जुन्नर वनक्षेत्रात सुमारे 1500 बिबटे जुन्नर वन विभागाच्या 611.22 चौ.कि.मी. क्षेत्रात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर हे तालुके समाविष्ट आहेत. हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे, घोड, कुकडी, माणिकडोह आणि पिंपळगाव जोगा धरणांमुळे या भागात ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब यांसारखी बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यामुळे बिबट्यांना पाणी, निवारा आणि भक्ष्य सहज उपलब्ध होतं. परिणामी या भागात सुमारे 1500 बिबट्यांचा स्थायिक अधिवास निर्माण झाल्याचं वनविभागाच्या अहवालात नमूद आहे.