ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी होणार क्रीडा संकुल; राज्याकडून मोठा निधी मंजूर

मुंबई : भारताला पहिले ऑलिम्पिकपदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर (ता. कराड) या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी राज्य शासनाने २५ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. अनेक अडचणीनंतर ही मंजुरी मिळाल्याने कुस्तीप्रेमींनी समाधान व्यक्त करताना राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.
सन १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांनी फ्री स्टाईलच्या ५७ किलो गटात भारताला पदक मिळवून देताना इतिहास रचला होता. परंतु खाशाबा जाधव यांना यथोचित सन्मान मिळाला नसल्याची सल कुस्तीप्रेमींमध्ये होती. यासंदर्भात एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेताना खाशाबा जाधव यांना पद्मभूषण व त्यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलाची मागणी केली होती. यावेळी मोहोळ यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते.
गोळेश्वर या ठिकाणी क्रीडा संकुल उभारणीला २००९ मध्ये शासनाने मान्यता दिली होती. मात्र त्यानंतर अडथळ्यांची शर्यत सुरु झाली होती. यावेळी राज्य शासनाने मोठा निधी मंजूर केल्याने लवकरच क्रीडा संकुल उभारणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी सांगितले आहे.





