पुसेगाव, (प्रतिनिधी) – पुसेगाव पोलिसांच्या पथकाने १४ गंभीर गुन्हे, १० पेक्षा अधिक एनबीडब्लू व स्टैंडिंग वॉरंटमध्ये फरारी असलेल्या झाकीर रिकव्हल्या काळे (मूळ रा. मोळ, सध्या रा. भांडेवाडी, ता. खटाव) असे अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांना आरोपी झाकीर काळे हा खातगुण परिसरात येणार असल्याची माहिती शनिवारी (ता. पाच) गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पुसेगाव पोलिसांचे पथक तयार करून खातगुण येथे त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी झाकीर हा गावातील बंधाऱ्याच्या भिंतीच्या आडोशाला दबा धरून बसलेला दिसताच पोलिसांनी सर्व बाजूंनी त्यास घेराव घातला. पोलीस येण्याची चाहूल लागताच झाकीरने गावातील घरांचा आडोसा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यास पथकाने पाठलाग करून शिताफीने पकडून ताब्यात घेतले. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ठाण्यात १२ गुन्हे, फलटण शहर ठाण्यात एक, वडूजला एक गुन्हा असे दाखल गंभीर १४ गुन्ह्यांतून तसेच न्यायालयाने काढलेल्या १० पेक्षा अधिक एनबीडब्ल्यू व स्टैंडिंग वॉरंट, पकड वॉरंटमध्येही बऱ्याच कालावधीपासून फरारी असलेला झाकीर रिकव्हल्या काळे यास पुसेगाव पोलिसांनी शिताफीने पकडून ही कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, हवालदार दौलत कुदळे, योगेश बागल, पोलीस नाईक सुनील अबदागिरे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जाधव, अविनाश घाडगे, उमेश देशमुख, होमगार्ड नीलेश पवार, कृष्णा यादव यांनी कारवाई केली.