रशियाचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 डिसेंबरपासून दोन दिवसांच्या भारत दौर्यावर येणार असल्याने सध्याच्या संघर्षमय वातावरणात ही भेट निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात रशिया एकटा पडलेला असतानाच दुसरीकडे अमेरिकेच्या जाचक टेरिफ धोरणामुळे भारतावरही अनेक आर्थिक संकटे ओढवली असताना या दोन देशांचे प्रमुख नेते चर्चा करणार आहेत हे निश्चितच महत्त्वाचे आहे. यापूर्वी रशियाच्या अनेक नेत्यांनी जरी भारताचे दौरे केले असले तरी पुतीन हे आजपर्यंतचे सर्वात बलाढ्य नेते समजले जातात. यापूर्वी काही तासासाठीच भारताच्या दौर्यावर आलेल्या पुतीन यांनी यावेळी दोन दिवस भारतात राहून विविध बाबींवर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेतर फार पूर्वीपासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच रशिया आणि भारत हे नैसर्गिक मित्र होते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतरच्या अनेक राजवटींनीसुद्धा रशियालाच आपला प्रधान मित्र मानला होता. भारतात स्वातंत्र्यानंतर नियोजनाच्या माध्यमातून जे पंचवार्षिक योजनांचे पर्व सुरू झाले त्यामागील प्रेरणासुद्धा रशियातील पंचवार्षिक योजना हेच होते. रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सुरू असतानासुद्धा भारताला रशियाबाबत सॉफ्ट कॉर्नर होता. अर्थात, गेल्या शतकाच्या शेवटी जगातील चित्र बदलल्यानंतर आणि शीतयुद्धाची समाप्ती झाल्यानंतर जगातील नेत्यांचे आणि देशांचे हितसंबंधही बदलले. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नेते अमेरिकेच्या बाजूने झुकले असले तरी रशियाची मैत्री कमी झाली नव्हती. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यानंतर जगातील सर्वच देशांनी रशियावर बहिष्कार टाकायची भाषा केली असतानासुद्धा भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली होती. रशिया आणि अमेरिका यांच्यातील जागतिक वैर जुनेच असल्यामुळे अमेरिकेचे न ऐकता भारताने रशियाबरोबर युद्धकाळातही आर्थिक संबंध सुरू ठेवण्याचा राग अमेरिकेच्या विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात होताच. त्यातूनच त्यांनी भारतावर जाचक टेरिफ लादले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या ताणलेल्या अवस्थेत असतानाच पुतीन भारताच्या दौर्यावर येत असल्याने त्यांचे स्वागत करावे लागणार आहे. आयात आणि निर्यात दोन्हीचा विचार करता भारतासाठी रशियाची भागीदारी सर्वात महत्त्वाची मानली जाते. संरक्षणाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाची असलेली अनेक उपकरणे 50% रशियाकडूनच खरेदी केली जातात. ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची ठरलेली ‘एस 400’ ही संरक्षण प्रणालीसुद्धा रशियाकडूनच घेण्यात आली होती. उभय देशांमध्ये होणारा व्यापार, संरक्षण संबंध या सर्व गोष्टींचा विचार करता पुतीन यांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेच्या दबावामुळे म्हणा किंवा रशियाला विरोध करण्याच्या हेतूने म्हणा पाश्चिमात्य देश एकवटले आहेत आणि त्याचा काही प्रमाणात फटका भारतालाही बसला आहे. भारत सोडता बहुतेक सर्व देशांनी रशियाबरोबर आपले व्यापारी संबंध काही प्रमाणात कमी केले आहेत. मात्र भारताने त्यामध्ये कोणतीही घट केली नाही. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना हे रुचलेले नाही. पण रशियाला मात्र भारताने दाखवलेल्या या मैत्रीची जाणीव आहे. भारतासाठी पुतीन यांचा हा दौरा जरी जागतिक राजकारणामधील एक बॅलन्सिंग अॅक्ट असला तरी पुतीन यांना मात्र आता भारतासारखा मोठा देश आपला सख्खा मित्र आहे हे दाखवणेसुद्धा महत्त्वाचे आहे. या दौर्यामध्ये दोनही देशांना हितकारक ठरतील असे अनेक निर्णय आणि करार होतील अशी चिन्हे आहेत. अर्थात सर्व घडामोडी घडत असताना दोन्ही देशांना अमेरिकेचा रोष पत्करावा लागणार आहे हे उघड आहे. अमेरिकेने भारतावर जास्त टेरिफ लावल्यानंतर गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक वेळा पुतीन आणि मोदी यांची जागतिक पातळीवर कोठे ना कोठे भेट झाली आहे आणि आता तर ते भारताच्या दोन दिवसाच्या दौर्यावर येणार असल्याने भारत आणि रशिया यांच्यातील या मैत्रीची गाठ अधिकच पक्की होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तो नाराजीचा मुद्दा असू शकतो. साहजिकच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा नेता भारतावर अजून काही जाचक अटी लादू शकतो. अर्थात, नजीकच्या कालावधीमध्ये स्वतः डोनाल्ड ट्रम्पसुद्धा भारताच्या दौर्यावर येणार आहेत. ट्रम्प यांचा तो दौरासुद्धा भारताला पुतीन यांच्या या दौर्याच्या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवावा लागणार आहे. 140 कोटी लोकसंख्या असलेला भारत हा देश शेवटी जगातील अनेक देशांसाठी मोठी बाजारपेठ असल्याने अमेरिका आणि रशिया या देशांचे नेते भारताबरोबर संबंध ठेवायला उत्सुक असतील तर त्यात नवल नाही. पण दीर्घकाळ भारताचा जो नैसर्गिक मित्र आहे त्या रशियाचे प्रमुख नेते दीर्घकाळानंतर भारतात येत असल्याने भारताने आपल्याला हितकारक ठरतील अशा गोष्टी या दौर्याच्या निमित्ताने पदरात पाडून घेणे सर्वात महत्त्वाचे ठरेल.