स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. भारतीय जनता पार्टीचे नेते असे कायम सांगतात. असे जर असेल तर आपल्याकडे वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षसंघटनेसाठी काम करणार्या कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी. तसे न करता इतर पक्षातील माणसे का जमवली जात आहेत? अन्य पक्षातील नेतेही भाजपमध्ये प्रवेश म्हणजे विजय हमखास या सध्याच्या वातावरणाला भुलून भाजपची शाल अंगावर पांघरताना दिसत आहेत. गेला महिनाभर सुरू असलेला आणि आणखी किमान आठवडाभर चालणारा 29 महापालिका हद्दीतील जुळवाजुळवीचा आणि पळवापळवीचा कार्यक्रम अत्यंत ओंगळ ठरतो आहे. अर्थात, याकडेही नकारात्मक दृष्टीने न पाहता त्यातून चांगले काय होणार आहे याचा विचारही व्हायला हवा. तो विचार करता हे जुळवाजुळवी आणि पळवापळवीचे अंक अंतत: फायद्याचेच ठरणार आहेत. त्याचे कारण असे की यात सगळ्याच पक्षांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या चेहर्यावरचे रंग खरवडून निघणार आहेत. अगदी स्थानिक पातळीवर चांगल्या कामाचा डंका पिटणारे कार्यसम्राट किती बेमालूमपणे रंग बदलतात याचीही प्रचिती येणार असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहता येईल. आयाराम गयाराम राजकारण पूर्वापार चालत आले आहे. हा प्रकार आता किळसवाण्या पद्धतीने शिगेला गेला आहे. राज्यात शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याचे आढळल्यानंतर अगोदर अजित पवार यांना भाजपने पळवले. तो प्रयोग फसल्यावर उद्धव ठाकरेंची अख्खी शिवसेनाच पळवली. पूर्ण बहुमत प्राप्त झाल्यावरही पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडले गेले. तेथून सुरू झालेला प्रवास लोकसभा, विधानसभा, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या मार्गे आता महापालिकेपर्यंत पोहोचला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात कोणाला तरी पळवले जाते आहे. प्रत्येक जिल्ह्यात पळवणार्यांच्या टोळ्याच स्थापन झाल्या आहेत. यात इतर पक्षही आहेतच; पण भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. त्यांच्या साथीला बसलेले एकनाथ शिंदे आणि काही प्रमाणात ज्यांनी आता सुरुवात केली ते अजित पवार यांचाही समावेश आहे. काँग्रेसही यात सामील झाली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काही प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे यात सगळ्यांत जास्त पोळले गेले आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमदार अथवा खासदारपदाच्या उंचीचा नेता फोडला तर ते एकवेळ क्षम्यही ठरते. विशेषत: ज्या पक्षाचा नेता फुटला असतो त्याला नुकसान होते. मात्र, ते भरून निघणारे असते. कारण, कार्यकर्त्यांची फळी खाली शाबूत असते. नगरसेवकांच्या निवडणुकीत त्या उंचीचे नेते पळवणे म्हणजे त्या पक्षाच्या पायालाच हादरा देण्यासारखे असते. असे हादरे सातत्याने दिले जात आहेत. बरे एका उमेदवारीसाठी फुटून जाणार्यांचीही मोठी गंमतच आहे. ज्या पक्षात अगोदरच मूळच्या त्यांच्याच लोकांना पाय ठेवायला जागा राहिलेली नाही तेथे जाऊन आपल्याला दारातच ताटकळत राहावे लागणार आहे याचा अंदाज या मंडळींना कसा येत नाही. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या सगळीकडे बाहेरच्यांना पक्षात घेण्यास प्रखर विरोध होत असतानाही भारतीय जनता पार्टीने त्याकडे दुर्लक्ष करत प्रवेश सोहळे केले. महापालिकांच्या निवडणुकांसाठी माजी महापौर अथवा माजी नगरसेवकापर्यंत ठीक होते, माजी आमदारांनाही गळाला लावले. जे या गळात सापडत आहेत ते असे भ्रमिष्टासारखे का वागत असावेत हेही एक कोडेच आहे. त्यांना असे काय मिळणार आहे जे त्यांच्या आमदारकीपेक्षा मोठे असेल? माजी मंत्री आणि अगदी माजी मुख्यमंत्रीही आपल्या पक्षातून फुटून बाहेर गेल्याचे आपण काही महिन्यांपूर्वी पाहिले. आज ती मंडळी नव्याने घरोबा केलेल्या पक्षाच्या कोणत्या कोपर्यात बसली आहे हे त्यांनाही उमगत नसावे. या सगळ्यात काही जुने एका विचाराचे आणि एका संस्काराच्या पक्षांचेही पुन्हा सूत जुळताना दिसत आहे. विचार आणि संस्कार सारखे असले की फार अडचण येत नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादीही तत्त्वत: एकत्र आली आहे. काही ठिकाणी काँग्रेसही त्यांच्या साथीला आहे. कालच बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि पुतणे म्हणजे उद्धव आणि राज एकत्र आले. त्यांचेही विचार-संस्कार सारखे असल्यामुळे जळवून घेण्यास फार वेळ लागला नाही. तसेच मराठीचा मुद्दाही त्यांच्यासाठी आहे. पण अगदीच काँग्रेसमधून किंवा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणे कसे जमते हे खरेच आश्चर्याचे असते. केवळ सत्ता आणि सत्ता हाच विचार दृढ झाला असल्यामुळे अनेक विद्रुप जोडपी एकत्र आलेली पाहायला मिळत आहेत. आता प्रश्न राहतो तो ज्यासाठी ही पळवापळवी सुरू आहे त्या महापालिकेचे काय होणार, ज्यांचे कथित नेते पळवले गेले आहे त्या पक्षांचे काय होणार, ज्या पक्षांनी नेते पळवले आहेत त्यांच्या पक्षात अगोदरच वेटिंगवर असलेल्या नेत्यांचे काय होणार आणि या सगळ्यांत हा सर्व प्रकार एकुणात चांगला कसा ठरणार? तर एक निर्विवाद सत्य खूप पूर्वी वारंवार सिद्ध झाले आहे अन् ते म्हणजे एखादा मंत्री, आमदार अथवा खासदार किंवा महापौर मोठे आंदोलन कदाचित उभे करू शकत नाही. तथापि, एखाद्या मोठ्या आंदोलनातून डझनभर आमदार, खासदार व मंत्री निर्माण होऊ शकतात. त्याचे कारण मतदार पळून कोण गेला आहे त्याची नोंद करतात. मूळ पक्षाशी प्रामाणिक राहण्याचाच मतदाराचा कल असतो. मतदार संघटितपणे दिसत नाही. मात्र, तो सगळीकडे आणि सदैव जागरूक असतो. केवळ हेच कारण असल्यामुळे इतकी पळवापळवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशकात करूनही पळवणार्यांची अस्वस्थता जात नाही. मतदाराचा याला पूर्णविराम देणारा कौलच निर्णायक ठरेल.