जेव्हा तुम्ही स्वत:हून एखादी गोष्ट करू शकत नसाल तेव्हा कोणाची किंवा कशाची मदत घेतली जाते त्याला ‘कुबड्या’ म्हणतात. हा शब्द सर्रास सर्वत्र वापरला जातो आणि राजकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अलीकडच्या काळात साधारण महिनाभरापूर्वी भाजपाचे चाणक्य अमित शहा यांनी तो वापरला. आता शहांनी ‘कुबड्या’ म्हणून कोणाचा उल्लेख केला तर अर्थातच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना. अन्य राज्यातही शहांच्या भाजपने कुबड्या वापरल्या आहेत. जेव्हा आपण स्वबळावर सत्तेवर येण्यास सक्षम आहोत असे भाजपला वाटते तोपर्यंत ते कुबड्या वापरतात. सक्षम झाल्यावर ते त्या टाकून देतात आणि पुन्हा आव्हान नको म्हणून कुबडीलाच पंगूही करतात. फार मागे जाण्याची गरज नाही. 2014 पासून देशातील बहुतेक राज्यात हाच प्रयोग झाला. आता महाराष्ट्रात निमित्त जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे असले तरी भाजप केवळ तेवढ्यापुरता विचार करत नाही किंवा करत नसावा हे ध्यानात घ्यायला हवे. शहांनी कुबड्यांचा विषय काढला तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा अचानक गतिमान झालेली पाहायला मिळाली. शहांच्या विधानाला पुण्यातील एका जमिनीच्या न झालेल्या व्यवहाराची पार्श्वभूमी होती. त्या व्यवहारामुळे भाजप केंद्रस्थानी आला आणि चौफेर टीका सर्वच माध्यमातून सुरू झाली. एवढे झाल्यावर प्रकरण दिल्लीपर्यंत गेले नसते तरच नवल. दिल्लीतून सूत्रे फिरली, राज्यात कोणाला काय सूचना द्यायच्या त्या दिल्या गेल्या आणि अवघ्या काही तासांत गाळ एकदम खाली बसला. पुढच्या नाट्यमय घडामोडींना सुरुवात मग येथूनच झाली. अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कथित जमीन घोटाळ्यासंदर्भातील माहिती बाहेर आली अथवा आणली गेली. त्यात काही दिवस अजित पवारांना नाही म्हटले तरी गुंतून राहावे लागले आणि खुलासे देण्यातच त्यांचा वेळ जातोय. एकनाथ शिंदे यांचे थेट स्वत:चे कोणते प्रकरण अद्याप बाहेर आले नाही. तथापि, गेल्या सहा-आठ महिन्यांत त्यांच्या मंत्र्यांची प्रकरणे नियमितपणे समोर आली. त्यात शिंदेंसोबत बंडखोरी करून भाजपशी घरोबा करणार्याच नेत्यांचा भरणा होता. ही मंडळी राजकीय पटलावर तशी संशयास्पदच असल्यामुळे त्यांच्याबाबतच्या ज्या बातम्या आणि माहिती माध्यमांतून आणि समाजमाध्यमातून प्रसूत केली गेली त्यामुळे त्यांच्याभोवतीचे संशयाचे धुके आणखीच गडद झाले. यात शिंदेंचीही दिल्लीवार्या करत पुरती दमछाक झालेली पाहायला मिळते. शिंदे यांनी जाणीवपूर्वक किंवा कदाचित तसे नसेलही भाजपला पुण्यातील प्रकरणात डिवचण्याचा प्रयत्न अपरोक्षपणे केला त्यामुळे हे भाजपने घडवले असावे असे म्हणतात. अजित पवार चाणाक्ष राजकारणी असल्यामुळे ते एकाच विषयात गुंतून न राहता पटकन त्यांच्या स्वभावानुसार कामाला लागले. शिंदेची कसोटी अजून सुरूच आहे किंबहुना आताच त्यांचा कसोटीचा काळ सुरू झाला असावा. राज्यातील ज्या प्रमुख महापालिका आहेत तेथे अगोदरच्या एकसंध शिवसेनेमुळे शिंदेंच्या सध्याच्या सेनेची स्थिती काहीशी भक्कम आहे. अगोदर मुख्यमंत्रिपद आणि आता उपमुख्यमंत्रिपद असा सत्तेत थेट सहभाग असल्यामुळे त्यांनी आपल्याच अगोदरच्या शिवसेनेचे शिलेदार फोडत आपली तटबंदी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला. तथापि, 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंसाठी स्थिती तेवढी अनुकूल राहिलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे त्यांच्या इच्छेविपरीत त्यांचे डिमोशन झाले. मुख्य पद गेल्यावर नाही म्हटले तरी बराच दरारा कमी होतोच. त्याहीपुढे आता भाजपने प्रमुख महापालिकांना डोळ्यासमोर ठेवून जे नियोजन चालवले आहे त्यात त्यांनी अगोदर शिंदेंच्या आजी-माजी समर्थकांनाच वेचण्यास सुरुवात केली. अगदी शिंदे यांच्या खासदार पुत्राच्या मतदारसंघापर्यंत भाजपची पळवापळवी मोहीम जाऊन पोहोचली. महायुती आगामी सर्व निवडणुका एकत्रच लढणार असे ठासून सांगितले जात होते. त्याचवेळी स्वत:च्या बळाची चाचपणीही केली जात होती. आजही एकत्रचा नारा दिला असला तरी मुंबई वगळता अन्यत्र कुठेही एकत्र लढण्याची भाजपची मानसिकता नाही आणि तशी त्यांची गरजही नाही हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळेच आपली रेघ मोठी करत जाण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल आणि प्रसंगी त्यांनी देशभरात आतापर्यंत गेल्या दहा वर्षांत जे केले तसेच करत आपल्या स्पर्धकांना आणि मित्र असलेल्या स्पर्धकांनाही दमवण्याची रणनीती आखली आहे. काही राज्ये अशी आहेत की जेथे भाजपला ठोस बहुमत आहे. तेथे त्यांनी विरोधकही औषधापुरता ठेवला आहे. दक्षिणेकडची दोन राज्ये आणि बंगालमध्ये त्यांचा शिरकाव झालेला नाही. मात्र ज्या राज्यांत त्यांनी पूर्वीच कोणाच्या तरी कुबड्या घेऊन शिरकाव केला आहे तेथे त्यांनी रितसर बस्तान मांडले आहे. बिहारमध्येही नितीश कुमार या कुबडीचा वापर त्यांना करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी ही कुबडी दुबळी करण्याचा प्रयत्न मागच्या निवडणुकीत कुशलपणे करून पाहिला. त्याचा त्यांना मनस्तापच झाला कारण पलटी मारण्यात नितीश तरबेज होते. आता नितीश यांनी पलटी मारली तरी आपली सत्ता जाणार नाही याची दक्षता भाजपने यंदाच्या निवडणुकीत घेतली. महाराष्ट्रातही स्थानिक निवडणुकांत आपली मतांची टक्केवारी कुठपर्यंत वाढते आहे याची चाचपणी भाजपला करायची आहे. त्याचा अभ्यास अर्थातच त्यांनी सुरू केला असणार. एकदा त्यांना अपेक्षित टक्केवारीपर्यंत आपण पोहोचतो आहे याची खात्री पटली की ते कुबड्या फेकतील.