Ramayana Movie: पुष्पक विमानापासून इंद्राच्या वज्रापर्यंत! रणबीरच्या ‘रामायण’मध्ये पाहायला मिळणार ‘हे’ अद्भुत चमत्कार; ४ हजार कोटींचं भव्य बजेट चर्चेत
Ramayana Movie चित्रपटातील युद्धप्रसंग अधिक प्रभावी करण्यासाठी हॉलीवूडमधील अनुभवी स्टंट तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे. 'अॅव्हेंजर्स: एंडगेम' या चित्रपटाचे स्टंट को-ऑर्डिनेटर टेरी नोटरी आणि 'थॉर: लव्ह अँड थंडर'चे स्टंट डायरेक्टर गाय नॉरिस हे चित्रपटातील अॅक्शन सीन्सवर काम करत आहेत. त्यामुळे रामायणातील युद्धप्रसंगांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.

Ramayana Movie: नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भव्य सेट, आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हीएफएक्स, दमदार कलाकार आणि रामायणातील अद्भुत प्रसंग यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. पुष्पक विमान, संजीवनी बूटी, हनुमानाची दिव्य शक्ती, ब्रह्मास्त्र आणि रावणाचे दहा चेहरे अशा अनेक गोष्टी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे बजेट चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया या चित्रपटातील खास गोष्टी…
भव्य व्हीएफएक्स आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान
‘रामायण’ चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यातील भव्य दृश्ये आणि व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX). चित्रपटातील अयोध्या, लंका, युद्धभूमी आणि पौराणिक स्थळे मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या DNEG या आंतरराष्ट्रीय स्टुडिओची मदत घेण्यात आली आहे. ‘द ओडिसी’, ‘ड्यून’ आणि ‘इंटरस्टेलर’ यांसारख्या चित्रपटांवर काम केलेल्या कलाकारांचा अनुभव या चित्रपटासाठी वापरण्यात येत आहे.
अॅक्शनसाठी हॉलीवूडमधील तज्ज्ञांची मदत
चित्रपटातील युद्धप्रसंग अधिक प्रभावी करण्यासाठी हॉलीवूडमधील अनुभवी स्टंट तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे. ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम’ या चित्रपटाचे स्टंट को-ऑर्डिनेटर टेरी नोटरी आणि ‘थॉर: लव्ह अँड थंडर’चे स्टंट डायरेक्टर गाय नॉरिस हे चित्रपटातील अॅक्शन सीन्सवर काम करत आहेत. त्यामुळे रामायणातील युद्धप्रसंगांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.
पुष्पक विमानाचा भव्य अवतार
रामायणातील सर्वात आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक म्हणजे पुष्पक विमान. हे सामान्य विमान नसून एक दिव्य रथ असल्याचे सांगितले जाते. देवांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी हे विमान ब्रह्मदेवासाठी तयार केले होते. पुढे ते कुबेराकडे आले. मात्र, रावणाने कुबेराचा पराभव करून हे विमान आपल्या ताब्यात घेतले.
हे विमान मनाच्या वेगाने प्रवास करू शकत होते आणि गरजेनुसार त्याचा आकारही बदलू शकत होता. रावणाने सीतेचे अपहरण करण्यासाठी याच विमानाचा वापर केला होता. पुढे रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण याच विमानातून अयोध्येला परतले होते.
संजीवनी बूटी आणि हनुमानाची शक्ती
रामायणातील लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानाने आणलेल्या संजीवनी बूटीचा प्रसंग आजही अनेकांच्या स्मरणात आहे. लंकेतील युद्धात लक्ष्मण गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संजीवनी बूटीची गरज भासते. ही बूटी शोधण्यासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वतावर जातात. मात्र, नेमकी कोणती वनस्पती संजीवनी आहे हे ओळखता न आल्याने ते संपूर्ण पर्वतच उचलून लंकेत घेऊन येतात. चित्रपटातील हा प्रसंग भव्य स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हनुमानाच्या दिव्य शक्तीही चित्रपटाचे खास आकर्षण ठरू शकतात. ते इच्छेनुसार आपला आकार लहान किंवा मोठा करू शकत होते. सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत प्रवेश करताना त्यांनी लहान रूप धारण केले होते, तर समुद्र पार करताना विशाल रूप घेतले होते. हे सर्व प्रसंग व्हीएफएक्सच्या माध्यमातून दाखवले जाणार आहेत.

Ramayana
ब्रह्मास्त्र, नागपाश आणि इंद्राचे वज्र
रामायणातील लढाई केवळ तलवार आणि धनुष्यबाणांपुरती मर्यादित नव्हती. या युद्धात अनेक दिव्य अस्त्रांचा वापर करण्यात आला होता. त्यापैकी ब्रह्मास्त्र हे अत्यंत शक्तिशाली अस्त्र मानले जाते. मेघनाद अर्थात इंद्रजितने युद्धात या अस्त्राचा वापर केला होता.
नागपाश हे आणखी एक दिव्य अस्त्र होते. या अस्त्रातून निघणारे सर्प शत्रूला जखडून टाकत असत. इंद्रजितने प्रभू राम आणि लक्ष्मण यांना रोखण्यासाठी नागपाशाचा वापर केला होता. याशिवाय चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देवांचा राजा इंद्र यांच्या हातात वज्रही पाहायला मिळतो. अभिनेता कुणाल कपूर इंद्राची भूमिका साकारत आहे.
रावणाचे दहा चेहरे आणि मारीचाचा सुवर्णमृग
रामायणातील आणखी एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे मारीचाने घेतलेले सुवर्णमृगाचे रूप. रावणाच्या सांगण्यावरून मारीचाने सोन्यासारखे चमकणाऱ्या हरणाचे रूप घेतले होते. त्या हरणाकडे सीता आकर्षित झाल्या आणि त्यांनी रामाकडे ते हरीण आणण्याची इच्छा व्यक्त केली. याच संधीचा फायदा घेत रावणाने सीतेचे अपहरण केले.
दुसरीकडे, रावणाचे दहा चेहरे हे त्याच्या ज्ञानाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जातात. सहा शास्त्रे आणि चार वेद यांच्याशी त्यांचा संबंध जोडला जातो. मात्र, अहंकारामुळे रावणाने आपल्या ज्ञानाचा चुकीच्या मार्गाने वापर केला.
चार हजार कोटींचे बजेट, दिग्गज कलाकारांची फौज
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक बजेट असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटाचे बजेट चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. अयोध्या आणि लंकेचे भव्य सेट उभारण्यात आले आहेत.
चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सनी देओल, रवि दुबे, अनुपम खेर, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय आणि कुणाल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘प्राइम फोकस स्टुडिओ’ आणि यशच्या ‘मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स’ यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘रामायण : पार्ट वन’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





