१) आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन? राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सॉलिसिटर जनरल याप्रकरणात वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायलायने याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (28 नोव्हेंबर) होणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, ही सुनावणी लांबल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम राहिली आहे. २) अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाची धडक; महिलेचा दुर्दैवी मृत्यू दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यातील औसा येथे प्रचार सभेसाठी जात असताना तेलगाव धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे एक मोठी दुर्घटना घडली. अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुसुम विष्णू सुदे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ३) सुप्रिया सुळेंनी केली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुंडे बंधू-भगिनी मैदानात उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या एका सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचे विधान केले होते. माझा सहकारी आज आपल्यात नाही याची जाणीव आहे. तसेच न्यायालय काय खरे काय खोटे हे तपासून पाहील, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. अशा लोकांबद्दल राज्यातील कोणत्याही नेत्याला आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहजे. अशा प्रवृत्तीला कोणत्याही पक्षातून मदत करण्याची भूमिका होत असेल तर त्या पक्षातून त्यांना काढून टाकले पाहिजे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केलीय. ४) गौरी पालवे मृत्यू प्रकरण : अनंत गर्जेंच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॅा. गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. या मृत्यू प्रकरणात गौरी यांच्या कुटुंबीयांकडून अनेक गंभीर आरोप गर्जे कुटुंबावर केल्याने प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली आहे. आता या प्रकरणात अनंत गर्जे यांच्या वकिलांनी कोर्टात मोठा दावा केला आहे. अनंत गर्जेच्या वकिलांनी प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉ. गौरी पालवेच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते, असा दावा केला आहे. त्याच्या पोलीस कोठडीला विरोध करताना न्यायालयात वकिलांनी ही गोष्ट सांगितली. ५) शतकांच्या जुन्या जखमा आज भरल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर वैदिक मंत्रांच्या गजरात आणि “जय श्री राम” च्या जयघोषात धर्मध्वजाचे ध्वजारोहण केले. यावेळी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी, “आज संपूर्ण जग राममय झाले आहे.” असे म्हटले. ध्वजारोहणानंतर अयोध्येत पंतप्रधान यांनी, “शतकांच्या वेदना आज अखेर संपत आहेत, शतकानुशतके झालेल्या जखमा बऱ्या होत आहेत. शतकानुशतके केलेला संकल्प पूर्ण होत आहेत. आज एका अशा यज्ञाचा अंतिम अर्पण आहे ज्याची आग ५०० वर्षे जळत होती. एक असा यज्ञ जो कधीही श्रद्धेत डगमगला नाही, कधीही श्रद्धेत डगमगला नाही.”असे म्हटले. ६) आज एका नवीन युगाची सुरुवात : योगी आदित्यनाथ अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचा समारोप मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज बसवून झाला आहे. या प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, मंदिरात ध्वजारोहण एका नवीन युगाची सुरुवात आहे. हा भगवा ध्वज धर्म (धार्मिकता), सत्य, न्याय आणि राष्ट्रवादाचे प्रतीक आहे.” असे म्हटले आहे. राम मंदिरात ध्वजारोहण केल्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांचे स्वागत केले. त्यांनी यावेळी, “हा दिवस भगवान श्री राम यांच्या भक्तांच्या अटळ भक्ती आणि संघर्षाला समर्पित आहे ज्यांनी या चळवळीसाठी आपले जीवन समर्पित केले.” असे सांगितले. ७) भाजपचा पाया हादरवून टाकीन : ममता बॅनर्जी देशातील निवडणूक आयोग एक निष्पक्ष संस्था नसून आता तो भाजप आयोग बनला आहे. मतदार यादीची सखोल आणि सघन तपासणी पश्चिम बंगालमध्ये मी होऊ देणार नाही. तरिही कुणी जबरदस्ती केली, तर मी संपूर्ण भारतात भाजपाचा पाया हादरवून टाकेन, अशा शब्दांत तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. बोनगाव येथील एका रॅलीत त्यांनी आरोप केला की, एसआयआर प्रक्रियेवर तृणमूल काॅंग्रेस नाराज असून मी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून अलिकडच्या निवडणुकीशी संबंधित दोन निर्देशांवर त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. एसआयआरनंतर मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक आयोग आणि भाजपने निर्माण केलेल्या आपत्तीची जाणीव लोकांना होईल. ८) मस्कच्या नेतृत्वाखालील DOGE बंद अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेला अमेरिकन सरकारचा DoGE विभाग नियोजित वेळेच्या आठ महिने आधीच बंद करण्यात आला आहे. २० जानेवारी २०२५ रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाने त्याची सुरुवात करण्यात आली होती आणि ४ जुलै २०२६ पर्यंत काम करण्याचे नियोजन होते. या विभागाने थेट किंवा खरेदी आणि लवकर निवृत्ती पॅकेजेसद्वारे २,५०,००० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. रॉयटर्सच्या मते, हा विभाग सुरुवातीला बराच सक्रिय होता, परंतु कालांतराने त्याने कर्मचारी गमावले. आता, त्याचे उच्च अधिकारी विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करत आहेत. ९) महिला कबड्डी संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला भारतीय महिला कबड्डी संघाने ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक 2025 जिंकत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.अंतिम सामन्यात भारताने चायनीज तैपेईचा 35–28 अशा गुणांच्या फरकाने पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने आपले उत्कृष्ट प्रदर्शन कायम राखले. त्यांनी सर्व गट सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना इराणशी झाला. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले. “महिलांच्या कबड्डी विश्वचषक 2025 मध्ये विजय मिळवून देशाला अभिमान वाटल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन. असं त्यांनी म्हटलं आहे. १०) ‘अॅनिमल’नंतर आता नव्या चित्रपटात होणार रणबीरची एन्ट्री? दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा ‘स्पिरिट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. या चित्रपटात मुख्यभूमिका साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान आता या चित्रपटातबाबत एक अपडेट समोर आली आहे.या चित्रपटात एक बॉलिवूड अभिनेता टर्निंग पॉइंट घेऊन येणार आहे. या चित्रपटासाठी वांगा यांनी पुन्हा एकदा त्यांचा ‘अॅनिमल’मधील अभिनेता रणबीर कपूरशी संपर्क साधला आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीर कपूरला ‘स्पिरिट’मध्ये कॅमिओ रोलची ऑफर दिली आहे.