Amrita Pritam: साहिरचं प्रेम ते इमरोजची साथ, अमृता प्रीतम यांच्या आयुष्याची कहाणी!
Amrita Pritam अमृता प्रीतम यांचा जन्म 31 ऑगस्ट 1919 रोजी तत्कालीन पंजाबमधील गुजरांवाला येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी आईला गमावलं. या घटनेनंतर त्यांच्या आयुष्यात एकटेपणा निर्माण झाला. याच काळात पुस्तकं आणि लेखन त्यांचा आधार बनलं.

Amrita Pritam: पंजाबी आणि हिंदी साहित्यविश्वातील प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आणि कादंबरीकार अमृता प्रीतम यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. प्रेम, विरह, एकटेपणा, फाळणीचं दुःख आणि महिलांच्या भावनांना त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज दिला. विशेष म्हणजे त्यांनी केवळ समाजावर लिहिलं नाही, तर स्वतःचं आयुष्यही आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या साहित्याइतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं.
लहानपणीच आईला गमावलं
अमृता प्रीतम यांचा जन्म 31 ऑगस्ट 1919 रोजी तत्कालीन पंजाबमधील गुजरांवाला येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी आईला गमावलं. या घटनेनंतर त्यांच्या आयुष्यात एकटेपणा निर्माण झाला. याच काळात पुस्तकं आणि लेखन त्यांचा आधार बनलं.
अमृतांनी लहान वयातच कविता लिहायला सुरुवात केली. अवघ्या 16व्या वर्षी त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘अमृत लहरें’ प्रकाशित झाला. पुढे कविता, कथा, कादंबऱ्या आणि आत्मचरित्र अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केलं.

amrita pritam and sahir ludhianvi
फाळणीच्या वेदना लेखणीत उतरल्या
1947 ची भारत-पाकिस्तान फाळणी अमृता प्रीतम यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला. लाहोरशी त्यांचं जवळचं नातं होतं. मात्र फाळणीच्या हिंसाचारामुळे त्यांना तिथून बाहेर पडावं लागलं. या काळातील वेदना त्यांच्या लेखणीतून प्रभावीपणे व्यक्त झाल्या.
‘अज्ज आखां वारिस शाह नूं’ ही त्यांची प्रसिद्ध कविता फाळणीच्या दुःखाचं प्रतीक मानली जाते. या कवितेत त्यांनी पंजाबच्या प्रसिद्ध कवी वारिस शाह यांना साद घालत फाळणीदरम्यान झालेल्या विध्वंसाचं चित्र मांडलं. विशेषतः या काळात महिलांनी सहन केलेल्या वेदना आणि संघर्षाला त्यांनी शब्द दिले.
त्यांची ‘पिंजर’ ही कादंबरीही फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या कादंबरीतून महिलांचं दुःख, सामाजिक बंधनं आणि फाळणीमुळे उद्ध्वस्त झालेलं आयुष्य समोर येतं. पुढे याच नावाने चित्रपटही तयार झाला.
साहिर लुधियानवी यांच्यावर होतं प्रेम
अमृता प्रीतम यांच्या आयुष्यात प्रसिद्ध शायर साहिर लुधियानवी यांचं विशेष स्थान होतं. दोघांचं नातं पारंपरिक चौकटीत बसणारं नव्हतं. भेटी कमी असल्या तरी त्यांच्यात भावनिक जवळीक होती. अमृतांच्या अनेक लिखाणातून या नात्याची झलक दिसून येते. त्यांच्या आत्मचरित्र ‘रसीदी टिकट’मध्ये साहिर यांच्याशी संबंधित अनेक आठवणींचा उल्लेख आहे. साहिर यांच्या आठवणी अमृतांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनल्या होत्या.
इमरोज यांच्या रूपाने मिळाला साथीदार
यानंतर त्यांच्या आयुष्यात चित्रकार इमरोज आले. दोघांनी पारंपरिक विवाहाच्या चौकटीबाहेर राहून दीर्घकाळ एकमेकांची साथ दिली. त्यांच्या नात्यात प्रेमासोबतच समजूतदारपणा, आदर आणि मैत्री होती. अमृता रात्री उशिरापर्यंत लेखन करत असत. इमरोज त्यांना साथ देत. त्यांच्या नात्यात मोठ्या वचनांपेक्षा छोट्या-छोट्या गोष्टींमधून जिव्हाळा दिसत होता. अमृतांच्या ‘मैं तैनू फिर मिलांगी’ या प्रसिद्ध कवितेशीही इमरोज यांचं नाव जोडलं जातं.

amrita pritam and imroz
महिलांच्या भावनांना दिला आवाज
अमृता प्रीतम यांच्या साहित्याची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी महिलांना केवळ पत्नी, मुलगी किंवा प्रेमिका म्हणून दाखवलं नाही. त्यांच्या लेखनातील स्त्री स्वतःच्या इच्छा, विचार, स्वप्नं आणि निर्णय असलेली व्यक्ती आहे.
महिलांवर लादलेल्या सामाजिक चौकटींवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे त्यांचं लेखन त्या काळाच्या पुढचं मानलं जातं. आजच्या पिढीलाही त्यांच्या लिखाणात प्रेम, संघर्ष आणि स्वतःची ओळख शोधण्याची प्रेरणा मिळते.
अनेक मान-सन्मानांनी गौरव
साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी अमृता प्रीतम यांना साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मविभूषण यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 31 ऑक्टोबर 2005 रोजी त्यांचं निधन झालं. मात्र त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचे शब्द आणि साहित्य जिवंत आहेत. प्रेम असो, फाळणीचं दुःख असो किंवा स्त्रीच्या मनातील भावना, अमृता प्रीतम यांनी प्रत्येक विषयाला स्वतःची भाषा दिली.
त्यांचं आयुष्य एक गोष्ट नक्की शिकवतं, समाजाने आखलेल्या चौकटींपेक्षा स्वतःची ओळख आणि मनाचा आवाज महत्त्वाचा असतो. म्हणूनच अमृता प्रीतम आजही केवळ एक लेखिका नाहीत, तर अनेक पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत आहेत.

