प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूरची श्रावणी प्रशांत शितापने गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या ऑल इंडिया कॅम्पमध्ये हरियाणा,पंजाब व दिल्ली येथील बलाढ्य स्पर्धकांना पराभूत करत कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आपली निवड निश्चित केली. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रावणी ५७ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशामागे कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव व इंटरनॅशनल वन स्टार पंच जयश्री व्यवहारे यांचे मोलाचे मार्गदर्शन व अथक परिश्रम आहेत. इंदापूरसारख्या ग्रामीण भागात ज्यूडो-कुराशसाठी गरीब व सामान्य कुटुंबातील शेकडो खेळाडूंना प्रसंगी मोफत प्रशिक्षण देत राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचे कार्य व्यवहारे व त्यांचा स्टाफ सातत्याने करीत आहेत. शेतकरी कुटुंबातील श्रावणीची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुराश खेळासाठी झालेली निवड खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. २०२४-२५ या वर्षात तिने राष्ट्रीय स्तरावर दोन पदकांची कमाई केली होती. तिच्या यशात कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नागर व महासचिव शिवाजी साळुंखे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. श्रावणीच्या या घवघवीत यशामुळे तालुक्यातून तसेच राज्यभरातील कुराशप्रेमींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तिच्या कामगिरीने आई-वडील आणि शहा हेल्थ क्लबचा अभिमान उंचावला असून,इंदापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे.