१. राज्यावर दुहेरी संकट ! राज्यावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळत आहे. सांगली जिल्ह्याला काल निसर्गाच्या दोन टोकाच्या रूपांचा अनुभव आला. सांगली जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्या पार गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यानंतर आता १९ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत मराठवाड्याला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. यात छत्रपती संभाजीनगरला १९ रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यातही अशी परिस्थिती पुढील चार दिवसांत असणार आहे. दुसरीकडे, अकोला आणि वर्धा या दोन शहरांनी तापमानाचा ४५ अंशांचा टप्पा ओलांडल्याने नागरिकांना दुपारच्या वेळी घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. २. राष्ट्रवादीत बंडखोरी! 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे बारामती पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सांगलीत राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असून, तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून गट नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सोपवले आहेत. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत गटनेते मैनूद्दीन बागवानांकडून पक्षाचा आदेश डावला गेल्याचा आरोप या नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे आता पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. Ladakhi Bahina Yojana ३. लाडक्या बहिणी मार्च-एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत लाडकी बहीण योजनेचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर जात आहे. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीत तर फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यात देण्यात आला. यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अजूनही मार्च महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. एप्रिल महिना सुरु होऊन २० दिवस उलटले आहेत तरीही अजून मागच्या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मार्चचा हप्ता अजून मिळाला नाही आणि एप्रिलच्या हप्त्याबाबतही कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. ४. ग्राहकांचा ई-वाहनांचा मोह सुटला? साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली असून शहरात नव्याने ७ हजार ५७९ वाहनांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ४ हजार ९९२ दुचाकी असून आकडेवारीनुसार अजूनही दुचाकीची पुण्यात मोठी क्रेझ असल्याचे दिसते. मात्र यंदा ई-वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसले. गतवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ८९३ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा थेट ३०६ वर घसरला आहे. यंदा इलेक्ट्रीक वाहनांमध्ये २२८ दुचाकी आणि ७९ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. चार्जिंग सुविधा, किंमत, अनुदानातील बदल आणि पारंपरिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल यामुळे ई-वाहनांची विक्री घटल्याचा अंदाज आहे. ५. नॅशनल हेराल्डप्रकरणी आज सुनावणी नॅशनल हेराल्ड प्रकरणातील ईडीच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास कनिष्ठ न्यायालयाने नकार दिला होता. या निर्णयाला सक्तवसुली संचालनालयाने (ED) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कनिष्ठ न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी ईडीचे आरोपपत्र फेटाळताना म्हटले होते की, मूळ एफआयआरमध्ये उल्लेख नसल्याने ही तक्रार कायद्याने निषिद्ध ठरते. मात्र या आदेशाला स्थगिती मिळावी, अशी मागणी ईडीने केली आहे. यावर उच्च न्यायालयाने सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया कंपनीला यापूर्वीच नोटीस बजावली असून, आजच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ६. तामिळनाडूतील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर जवळ असलेल्या कट्टनरपत्ती गावात एका फटाका कारखान्यात रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात २३ ठार झाले असून, अनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत. यात स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात ३० कामगार काम करत होते. या स्फोटमुळे इमारतीचा काही भाग कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता. यानंतर तातडीने प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. फटाका कारखान्यात झालेल्या या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार फटाके तयार करताना सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यामुळे हा अपघात झाला असावा. या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. Ayatollah Ali Khamenei ७. खामेनींच्या दफनविधीबाबत सस्पेन्स कायम अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी केलेल्या एका भीषण हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला. मात्र खामेनी मारले जाऊन आता ५० दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत इराण सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणचे अधिकारी सध्या मोठा सार्वजनिक अंत्यविधी आयोजित करण्यास खूप घाबरलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही, जर बुधवारी कोणत्याही करारावर शिक्कामोर्तब झाले नाही, तर युद्ध पुन्हा सुरू होऊ शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या परिस्थितीत आपल्या सर्वोच्च नेत्याचा सन्मानाने अंत्यविधी करणे इराणसाठी केवळ धार्मिक बाब उरलेली नसून ते मोठे राजकीय आव्हान बनले आहे. ८. अमेरिकासोबतच्या दुसऱ्या चर्चेसाठी इराणचा नकार? इराण आणि अमेरिका यांच्या युद्धविरामादरम्यान २२ एप्रिल रोजी पाकिस्तानात चर्चेची दुसरी फेरी नियोजित करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी आपले उच्चस्तरीय डेलिगेशन पाकिस्तानात पाठवण्याची तयारी केली असतानाच, इराणने आता अटी शर्थींचे राजकारण सुरू केले आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही तासांतच इराणच्या ‘तस्नीम न्यूज’ने इराणच्या शिष्टमंडळाचा हवाला देत ही चर्चा अधांतरी असल्याचे स्पष्ट केले. “जोपर्यंत अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपली नाकाबंदी हटवत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चेसाठी बसणार नाही,” अशी ठाम भूमिका इराणने घेतली आहे. पहिल्या फेरीच्या चर्चेनंतर पाकिस्तानचे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, इराणच्या भूमिकेमुळे पाकिस्तानच्या या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ९. श्रेयस अय्यरच्या ‘त्या’ कृतीने हसू अनावर आयपीएल 2026 च्या हंगामात काल पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या सामन्यात पंजाब किंग्सने 54 धावांनी विजय मिळवला. 20 षटकांत 7 बाद 254 धावा उभारल्यानंतर पंजाबने लखनौला 20 षटकांत 5 बाद 200 धावांवर रोखले. या सामान्यादरम्यान, पंजबाचा फलंदाज शशांक सिंहने सामन्यात तीन महत्वाचे झेल सोडले. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टींगसह पंजाबचे गोलंदाज चांगलेच चिडल्याचे पाहायला मिळाले. शशांक सिंह वारंवार झेल सोडत असताना श्रेयस अय्यर हसताना दिसून आला. तसेच सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यर शशांक सिंहकडे गेला आणि खांद्यावर हात टाकून टोपीने त्याच्या चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. श्रेयस अय्यर आणि शशांक सिंहच्या या कृतीमुळे सगळ्यांना हसू अनावर झाले. PBKS vs LSG Punjab beat Lucknow to register fifth consecutive win Priyansh Arya Cooper Connolly IPL 2026 १०. ‘सलमान भाई, तन्वी हिंदी बिग बॉसमध्ये जायला पाहिजे’ तन्वी कोलते हिला बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची ट्रॉफी मिळाली. तन्वी जिंकणार असं पहिल्यापासून अनेकजण म्हणत होते. यात राखी सावंतचंही नाव होतं. त्यानंतर राखीने तिच्यासोबत व्हिडिओ करत सगळ्यांसमोर तन्वीला थेट हिंदी बिग बॉसची ऑफर दिली. राखी म्हणाली, “मी सगळ्यांना बोलले होते पहिल्या दिवसापासून की तन्वी जिंकणार. माझ्या जीभेवर तीळ आहे. यावर तन्वी म्हणते ‘राखीच्या जिभेवर तीळ आहे आणि राखीकडे फार मोठं मन आहे. राखी मला म्हणाली होती की मी जिंकणार. बघा १०० दिवसांनंतर माझ्या हातात ट्रॉफी आहे.’ यावर राखी म्हणते, ‘सलमान भाई, तन्वी हिंदी बिग बॉसमध्ये जायला पाहिजे. तेव्हा मी वाईल्ड कार्ड म्हणून येईल आणि तिची वाट लावेन’ यावर तन्वीसह सगळेच हसले. हेही वाचा: Tanvi Kolte : बिग बॅासची ट्राफी जिंकल्यानंतर तन्वी कोलतेची पहिली प्रतिक्रिया समोर