प्रभात वृत्तसेवा इंदापूर – नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी इंदापूरमध्ये प्रबळ दावेदारांनी केलेली मनधरणी जोरदार यशस्वी ठरली. अनेक अपक्षांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी फक्त पाच उमेदवार, तर नगरसेवकांच्या 20 जागांसाठी 52 उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे इंदापूरमध्ये मुख्य सामना राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध कृष्णाभीमा विकास आघाडी असा रंगणार आहे. मूळतः नगराध्यक्ष पदासाठी 14 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 169 अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती नगराध्यक्षांचे 3 आणि नगरसेवकांचे 19 अर्ज बाद झाले. त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी 11 आणि नगरसेवकांसाठी 150 उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र होते;’ मात्र अपक्ष उमेदवारांनी मतविभाजन होऊ नये म्हणून प्रमुख पक्षांनी सुरू केलेल्या संपर्क मनधरणी मोहिमेला आज यश मिळाले आहे. शहरात मागील दोन दिवसांपासून राजकीय तापमान शिगेला पोहोचले होते. अपक्षांना पाठिंबा, विकास कामांवरील आश्वासने, गटनेत्यांमध्ये सलग चर्चा, मध्यस्थी अशा विविध पद्धतींनी दोन्ही प्रमुख पॅनेलनी परिस्थिती साधण्याचा प्रयत्न केला. अखेर या प्रयत्नांना मिळालेल्या प्रतिसादामुळे रिंगण सुटसुटीत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध कृष्णाभीमा विकास आघाडी नगराध्यक्ष पदासाठी : 5 उमेदवार, नगरसेवक पदासाठी : 20 जागा – 52 उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे जनतेचे लक्ष आता सरळसरळ दोन प्रमुख आघाड्यांतील लढतीकडे वळले आहे. शहर विकासाचे प्रश्न, स्थानिक पातळीवरील गट-राजकारण, मतदारांचा कल, मागील पाच वर्षांचा कारभार आणि नव्या आश्वासनांची विश्वसनीयता-या सर्व गोष्टींवर अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे. इंदापूरमध्ये आता निवडणुकीचा ‘क्लायमॅक्स’ रंगण्यास सज्ज झाला आहे.