नगर – लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु झाल्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांच्या आग्रहाखातर आज भिंगार शहरातील बाजारपेठ सुरु करण्यात आली. तथापि, पहिल्याच दिवशी करोना प्रतिबंधक नियमांचा शहरात फज्जा उडाला. त्यात नागरिकांनी दाखविलेला हलगर्जीपणा चिंताजनक होता. भल्या सकाळी भरलेल्या भाजीबाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे बहुतांश नागरिकांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. तसेच भाजी विक्रेत्यांसमोर फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचेही सर्रासपणे उल्लंघन होताना दिसले. नागरिकांच्या या हलगर्जीपणाकडे प्रशासनानेही कानाडोळा केला. भिंगार पंचशील वेस येथे हा भाजीबाजार भरला होता. त्यावेळी छावणी प्रशासनाचे कर्मचारी कर गोळा करण्यात मग्न होते. रस्त्यावर यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. सर्वांनाच त्यातून वाट काढत मार्गस्थ व्हावे लागत होते. भिंगार शहरात अजून एकही करोनाबाधित आढळून आलेला नाही. मात्र, शहराला लागूनच असलेल्या नगरमध्ये करोनाबाधितांची संख्या रोज वाढत आहे. मागील दोन दिवसांत नगरमध्ये तब्बल चाळीसपेक्षा जास्त रुग्णांची भर पडली. असे असताना भिंगारमधील हा हलगर्जीपणा नव्या संकटाला तोंड देईल, अशीच आजची स्थिती होती.