पंजाबमध्ये श्वान दंशावर आता होणार मोफत उपचार

चंदीगड : पंजाबमधील सर्वसामान्यांच्या आरोग्याबाबत त्या राज्यातील भगवंत मान सरकारने आणखी एक मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता कुत्रा चावण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीतही, लोकांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात महागडे शुल्क द्यावे लागणार नाही किंवा त्यांना मोठ्या सरकारी रुग्णालयात जावे लागणार नाही.
पंजाबमधील मोहल्ला क्लिनिकमध्ये अँटी-रेबीज इंजेक्शन आता पूर्णपणे मोफत दिले जाईल. आरोग्य विषयक उपचार हा आता प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, त्याची जबाबदारी सरकारची असेल असे आश्वासन पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारने दिले होते. त्यानुसारच हा निर्णय असून ही एक सेवा असल्याचे सरकारने म्हटले आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त जिल्हा किंवा उपविभाग स्तरावरील रुग्णालयांपुरती मर्यादित होती, परंतु आता मोहल्ला क्लिनिक इतके मजबूत करण्यात आले आहेत की तेथे आपत्कालीन परिस्थितीवर उपचार देखील शक्य आहेत.
खाजगी रुग्णालयांमध्ये, हे अँटी-रेबीज इंजेक्शन प्रति डोस 350 ते 800 रुपयांना उपलब्ध आहे आणि संपूर्ण लसीकरण उपचाराची किंमत 2000 ते 4000 रुपये आहे. आता हे संपूर्ण उपचार मोहल्ला क्लिनिकमध्ये एकही रुपया खर्च न करता उपलब्ध होतील. एवढेच नाही तर आम आदमी पक्षाचे सरकार राज्यभर टप्प्याटप्प्याने मोफत लसीकरण मोहीम सुरू करत आहे, जेणेकरून कोणताही व्यक्ती वेळेवर उपचारांपासून वंचित राहू नये.
राज्यभरात सध्या ८८० हून अधिक मोहल्ला क्लिनिक कार्यरत आहेत, त्यापैकी ५६५ गावांमध्ये आणि ३१६ शहरांमध्ये उघडण्यात आले आहेत. त्यांची व्याप्ती सातत्याने वेगाने वाढवली जात आहे. आतापर्यंत १.३ कोटींहून अधिक लोकांना या क्लिनिकचा फायदा झाला आहे आणि ३.७ कोटींहून अधिक लोकांनी ओपीडी सेवांचा वापर केला आहे.





