पुणे जिल्हा | जुन्नर तालुका बिबट मुक्त करा

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर तालुका बिबट मुक्त करण्यात यावा, शेतकर्यांना दिवसा थ्री फेज विद्युतपुरवठा करण्यात यावा या व अन्य मागण्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना बळीराजच्या वतीने महाविकास आघाडीने जुन्नरचे तहसीलदार यांच्याकडे दिले. तर शासनाने या सर्व मागण्या मान्य न केल्यास तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मोर्चाच्या वेळी देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक घोलप, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार (दि. 6) जुन्नर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शरद लेंडे, सुरज वाजगे, अनंतराव चौगुले, संभाजी तांबे, मोहित ढमाले, रौफ खान, सईद पटेल, सुनील मेहेर, मोहन बांगर, तुळशीराम भोईर, प्रदीप थोरवे, शाम माळी, सोनल शेटे, चैताली केंगले आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाने या सर्व मागण्या तातडीने मान्य न केल्यास जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जुन्नर तहसीलदार यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारत मोर्चाच्या भावना शासनाकडे पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
या आहेत मागण्या
जुन्नर तालुका प्राधान्याने बिबट मुक्त करा
शेतमालावरची निर्यात बंदी उठवा
दुधाला 40 रुपये हमीभाव द्या
विविध आंदोलनात शेतकर्यांचे दाखल गुन्हे मागे घ्या
शेतकर्यांना पूर्णपणे कर्ज माफी देण्यात यावी





