मांडवगण फराटा -शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांनी होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती घरातच न थांबता गावात नातेवाइकांकडे, मित्र मंडळींकडे रुबाबात फिरत आहेत.
पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आदी जिल्ह्यांतील नागरिक गावाकडे आले आहेत. बाहेरगावाहून आलेल्या लोकांना मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते यांनी होम क्वारंटाइन करून हातांवर शिक्के मारले आहेत. तरीही अनेकजण फिरताना दिसत आहेत.
क्वारंटाइन केलेले नागरिक हे स्वतःच्या कुटुंबासह समाजासाठी घातक आहेत. अनेकजण आपल्याकडे बाहेरून नातेवाईक येऊनही आरोग्य अधिकारी अथवा पोलिसांना माहिती देत नाहीत. शेजारी सुध्दा भांडण नको म्हणून गप्प बसत आहेत. बाहेर फिरणाऱ्या नागरिकांमुळे पूर्व परिसराला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होम क्वारंटाइन नागरिकांनी स्वतःहून अलगीकरण करून घेणे गरजेचे आहे.
मांडवगण फराटा येथील अनेक वाहनचालक पुणे, मुंबई आदी ठिकाणी शेतीमाल विक्रीसाठी घेऊन जात आहेत. त्या वाहनचालकांना करोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. परंतु वाहनचालक बिनधास्त फिरत आहेत. त्या वाहनचालकांनी स्वतः अलगीकरण करायला पाहिजे, असे मत डॉ. मंजुषा सातपुते यांनी व्यक्त केले आहे.
मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आतापर्यंत एकूण 1 हजार 231 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांपैकी 962 लोकांची मुदत संपली आहे. त्यातील 265 व्यक्तींना होम क्वारंटाइन केले आहे. हे क्वारंटाइन केलेले नागरिकच गावात फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाचा धाक राहिलेला नाही, हेच दिसत आहे.
बाहेरगावरून आलेल्या व्यक्तींना गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात येईल. स्वयंसेवक, आशासेविका, वॉर्ड सदस्य यांना कामाची विभागणी करून दिली आहे. दोन दिवसांत संपूर्ण गावात सर्व्हे केला जाणार आहे. करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीचे प्रमुख तलाठी हे कायम गैरहजर राहत असल्याने गावातील कोणताच निर्णय घेता येत नाही. गावाची जबाबदारी असलेले तलाठी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी नागरिकांना मात्र वाऱ्यावर सोडत आहेत. महसूल विभागाने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
– शिवाजी कदम, सरपंच, मांडवगण फराटा.