Fraud Marriage: जिल्ह्यातील उमापूर परिसरात लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या टोळीतील नवरीने आतापर्यंत चक्क आठवेळा लग्न करून विविध नवरदेवांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता. नवव्या लग्नाच्या तयारीत असतानाच या ‘बोगस नवरी’चे बिंग फुटले आणि पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. अशी उघडकीस आली फसवणूक – (Fraud Marriage) उमापूर येथील योगेश शिंदे या युवकाला लग्नासाठी मुलगी दाखवून एजंटमार्फत व्यवहार ठरवण्यात आला होता. लग्न लावून देण्यासाठी तरुणाकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच या नवरीच्या हालचालींबाबत संशय आल्याने पीडित तरुणाने चौकशी केली. तपासात या तरुणीने यापूर्वी आठ जणांशी विवाह करून त्यांना लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच योगेश शिंदे यांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दिली. टोळी फसवणूक कशी करायची ? (Fraud Marriage) ही टोळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील उपवर तरुणांना आपले सावज बनवत असे. लग्नासाठी इच्छुक असलेल्या पण काही कारणास्तव लग्न जमण्यास अडचण येणाऱ्या तरुणांना एजंट शोधायचे. मुलगी पसंत पडल्यानंतर लग्नाचा खर्च आणि एजंटचे कमिशन या नावाखाली २ ते ३ लाख रुपये घेतले जात. लग्न झाल्यानंतर काही दिवस सासरी राहून दागिने आणि पैसे घेऊन नवरी पसार व्हायची किंवा किरकोळ कारणावरून वाद घालून माहेरी निघून जात असे. सोलापूर कनेक्शन आणि वाढते जाळे – काही दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. गुजरातच्या कुसुमबेन घाटाड या महिलेने आपली खरी माहिती लपवून दुसरे लग्न केले होते. या प्रकरणात तिच्यासह कुटुंबातील सदस्य आणि एजंटवर गुन्हे दाखल झाले आहेत. बीडमधील या ताज्या घटनेमुळे अशा टोळ्यांचे जाळे राज्यभर पसरल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस आता त्या दिशेने तपास करत आहेत. पोलिसांचे आवाहन: “लग्न जमवताना केवळ एजंटवर विसंबून न राहता मुलीच्या कुटुंबाची आणि पार्श्वभूमीची सखोल चौकशी करावी. कोणताही संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.” चकलांबा पोलिसांत गुन्हा दाखल – पीडित योगेश शिंदे यांच्या तक्रारीनंतर चकलांबा पोलिसांनी नवरीसह संबंधित एजंटाला अटक केली आहे. या टोळीमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, तसेच इतर किती तरुणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून फसवणूक झालेल्या इतर तरुणांनीही पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.