पिंपरी, (प्रतिनिधी) – तुमच्या नावाने इराण येथे पार्सल जात असून त्यामध्ये ड्रग्स आहेत, असे सांगून महिलेची 24 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने चार आरोपींना अहमदनगर, जळगाव आणि सुरत येथून अटक केली. स्वरूप अशोक खांबेकर (वय 42, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), पुष्कर चंद्रकांत पाखले (रा. जळगाव), मोनीक भरतभाई रंगोलीया आणि कौशिक मनसुखभाई बोरड (दोघेही रा. सुरत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बाणेर येथील 38 वर्षीय महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींनी एका महिलेला फोन करुन आपण फेडेक्स कुरीअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने पार्सल इराणला कुरिअर जात असून त्यात ड्रग्स आहे, अशी भीती दाखविली. मुंबई येथे येऊन ते तुमचे पार्सल नाही हे क्लियर करावे लागेल किंवा ऑनलाइन स्काइप ॲपवरून बोलून क्लियर करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर स्काइप ॲपच्या माध्यमातून फिर्यादी महिलेच्या मोबाइलच्या स्क्रीनचा ॲक्सेस मिळवला. महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून 24 लाख 99 हजार 998 रुपये बँक खात्यावर घेतले. सायबर पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्याची माहिती घेत आरोपींना अहमदनगर, जळगाव आणि सुरत येथून ताब्यात घेतले. ’त्या’ बँक खात्यावरून दोन कोटींचे व्यवहार आरोपींनी वापरलेल्या एसबीआय बँकेच्या खात्यावर दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत. त्या खात्याबाबत भारतातून 68 तक्रारी आल्या असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.