लोणंद वखार केंद्रात लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश

लोणंद – तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून सुमारे 87 लाख 76 हजार 903 रुपयांच्या मालमत्तेच्या अपहार केल्याप्रकरणी एका माजी केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने अन्न–धान्य साठवण व्यवस्थापनातील मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कापडगाव (ता. फलटण) येथील लोणंद वखार केंद्रात ६ जून २०१६ ते २ डिसेंबर २०२४ या कालावधीत संशयित समीर अशोक नाडगौड याने शासकीय धान्याचा मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रप्रमुख असताना समीर नाडगोड याने ७६२ पोती गहू (किंमत १० लाख ५६ हजार ९५५ रुपये), ५७६पोती तांदूळ (किंमत ११लाख,६५ हजार ९३६ रुपये) असा एकूण १३३८ पोत्यांचा (किंमत २२ लाख२२ हजार ८९१ रुपये) अपहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच आयआरआरएस व डीओएस प्रणालीमध्ये खोट्या नोंदी करून ६५ लाख ५४ हजार १२ रुपयांच्या तांदळाचा अपहार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. एकूण अपहार रक्कम तब्बल ८७ लाख ७६ हजार ९०३ रुपये आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय प्रमुख तृप्ती कोळेकर यांन दिलेल्या तक्रारीवरून लोणंद पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे. संशयित समीर नाडगौड याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक हेगडे तपास करीत आहेत.




