पिंपरी | शेअर मार्केटच्या नावााखाली साडेतीन लाखांची फसवणूक

पिंपरी, (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मित्राची साडेतीन लाखांची फसवणूक केली. ही घटना ६ फेब्रुवारी ते 17 जून २०२४ या कालावधीत हिंजवडी येथे घडली.
जयदेव हरजनदार डेंब्रा (वय 49, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनीत विजय भोमे (रा. राजगुरुनगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयदेव यांचा मित्र आरोपी विनीत याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दहा टक्के परतावा देण्याचे जयदेव यांना आमिष दाखवले.
जयदेव यांना आरोपीने त्याच्या ऑफिसमध्ये नेऊन कामाची माहिती देत त्यांचा विश्वास संपादन करून साडेतीन लाख रुपये घेतले. त्यानंतर जयदेव यांना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.





