पुणे जिल्हा | अवसरी भागात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

अवसरी, (वार्ताहर) – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील कौलीमळा येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर विष्णु भोर (वय ७०) यांच्या जवळील चार तोळे वजनाची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी चेारून नेली. चेन चोरीला गेल्याने ज्ञानेश्वर भोर यांचे अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार, असे प्रकार घडत आहेत. त्या मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अवसरी खुर्द गावच्या पश्चिमेला कौलीमळा आहे. रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ज्ञानेश्वर भोर व त्यांच्या समवेत वस्तीवरील दोन ते चार मित्र चावडीवर गप्पा मारत होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरटे आले.
त्यापैकी एकजण ज्ञानेश्वर भोर यांच्याजवळ आला व भोर यांना म्हणाला बाबा तुमच्या गळ्यातील चेन खरी आहे की खोटी ? आम्हाला पहायची आहे. असा बहाणा केला व त्यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याची चेन पाहण्यासाठी घेतली व दोघे पसार झाले.
एक महिन्यापूर्वी मंचर मुळेवाडी रोड कॉलेज रस्त्यावर अशाच प्रकारची घडला घडली होती. या पूर्वी सुद्धा अवसरी, मंचर आणि परिसरात अशा घटना घडल्या आहेत. जेष्ठ महिला, आणि पुरुष यांना अनेक भागात लुबाडले आहे. मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकांचे सोन्याचे दागिने पळवण्याच्या घटकांमध्ये वाढ झाली आहे. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने या प्रकारावर आळा घालण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




