अकलूज – तिरुमाला देवस्थान ट्रस्ट, तिरुपती याचे बरोबर पुजेच्या वस्तूंसाठी ठरलेल्या व्यवहारातून मिळणाऱ्या 3 हजार कोटींपैकी 130 कोटी रुपये तुम्हाला देतो असे सांगून गुजरात येथील एकाला तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अकलूज पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. याप्रकरणी आंबादास उर्फ आण्णा सायबू ओरसे (रा. राऊतनगर अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाशराज शेषमलजी जैन (रा. 12 बी, शांतीनिकेतन सोसायटी, गुजरात कॉलेजजवळ, लॉ गार्डन अहमदाबाद गुजरात) यांना दिनांक 29 जून 2019 ते 16 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आंबादास उर्फ आण्णा सायबु ओरसे याने तिरुपती येथील तिरुमाला (बालाजी) देवस्थान ट्रस्ट यांच्या बरोबर पुजेच्या वस्तूंसाठी व्यवहार ठरला आहे. ठरलेल्या व्यवहाराची 3 हजार कोटी रक्कम ट्रस्टकडून मिळणार आहे. तसेच मिळालेल्या तीन हजार कोटींपैकी 130 कोटी रुपये तुम्हाला देतो, असे सांगितले.
परंतु त्याकरीता अगोदर मला पैसे दयावे लागतील अशी अटही घातली. त्यानुसार जैन यांच्याकडून वेळोवेळी रोख व आरटीजीएस व्यवहाराने एकुण 2 कोटी 58 लाख रुपये उकळले. तसेच फिर्यादीचे मित्र मदन मिरजकर यांच्याकडून 15 लाख रोख रुपये असे एकुण 2 कोटी 78 लाख रुपये घेवून फसवणूक केली.
त्यानंतर जैन हे आरोपी आंबादास याच्याकडे पैसे मागण्यास गेले असता त्याने जैन यांना पैसे परत मागितले तर तुझ्या बायकोला उचलून नेहण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याबाबत अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस माळशिरस न्यायालयात हजर केले असता त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.