पुणे | तरुणीची पावणेदहा लाखांची फसवणूक
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोलीस कारवाईची भीती घालून फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सीबीआय, एनसीबी, तसेच ईडीच्या कारवाईची भीती दाखवून गेल्या काही दिवसांत शहरात फसवणुुकीचे गुन्हे वाढीस लागल्याचे चित्र आहे.
नुकतीच विमानतळावर जप्त करण्यात आलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची भीती दाखवून येरवडा भागातील एका तरुणीची सायबर चोरट्यांनी नऊ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत एका तरुणीने येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधून मुंबई गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी केली. मुंबई विमानतळावर तरुणीच्या नावाने कुरिअरद्वारे इराणला पाठविण्यात येणारे पाकीट जप्त केले आहे.
त्यात तीन पारपत्र, क्रेडिट कार्ड, अंमली पदार्थ सापडले आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येणार असून, अंमली पदार्थविराेधी पथकाकडून (एनसीबी) चौकशी करण्यात येईल, अशी भीती तरुणीला दाखवली.
त्यानंतर तरुणीला कारवाई टाळण्यासाठी तातडीने काही रक्कम जमा करावी, असे सांगण्यात आले. चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात तरुणीने वेळोवेळी नऊ लाख ८६ हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तपास करत आहेत.





