वाघोलीत मोफत रेशनकार्ड उपक्रमात फसवणूक

वाघोली : वाघोली येथे डिसेंबर २०२४ मध्ये माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी राबविलेल्या मोफत रेशनकार्ड उपक्रमात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. रेशनकार्ड काढून देण्याच्या नावाखाली कागदपत्रे आणि पैसे घेऊन पसार झालेल्या संशयिताविरोधात सातव यांनी हवेली तालुक्याच्या अप्पर तहसीलदार आणि वाघोली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले की, डिसेंबर २०२४ मध्ये वाघोलीतील नागरिकांसाठी मोफत रेशनकार्ड वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाचे उद्घाटन तत्कालीन आमदार अशोक पवार, बापूसाहेब पठारे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले होते. यात १,२३३ नागरिकांनी रीतसर अर्ज केले होते. तहसील कार्यालयातील संगणक चालक गिरीश कोळे याने प्रत्येक रेशनकार्डासाठी १,००० रुपये घेऊन तातडीने रेशनकार्ड देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, सातव यांनी कोळे याला २ लाख ५० हजार रुपये रोख दिले, तर उर्वरित १० लाख रुपये काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले होते.
मात्र, कोळे याने अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते या रजेवर असल्याचे, मीटिंगला गेल्याचे किंवा संगणक प्रणालीत बिघाड झाल्याचे अशी विविध कारणे सांगून वेळ मारून नेली. आजअखेर एकही रेशनकार्ड न देता त्याने नागरिकांची कागदपत्रे आणि सातव यांचे २ लाख ५० हजार रुपये परत केले नाहीत. अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याशी भेटल्यानंतर सातव यांना फसवणुकीची खात्री झाली. त्यांनी गिरीश कोळे याच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
अप्पर तहसीलदारांची प्रतिक्रिया –
अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते म्हणाल्या, “राजेंद्र सातव पाटील यांची लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांना तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.”
पोलिसांचा तपास सुरू –
वाघोली पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, संशयित गिरीश कोळे याच्याविरोधात तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.





