सोयरिकीच्या नावाखाली फसवणुकीचा फंडा!

जामखेड – खेड्यातल्या मुलींची मुंबई-पुण्यातील जोडीदारांची स्वप्ने, तर लहरी हवामानामुळे शेतकऱ्याची घसरलेली पत यामुळे शेतकरी नवरदेवाला नवरीच मिळेनाशी झाली आहे. या अगतिकतेचा फायदा घेऊन लग्न जमवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, त्यांच्याकडून या विवाहेच्छुक नवरदेवाची आर्थिक लूट सुरू आहे. नवरीला एक लाखाच्या पुढे हुंडा द्यावा लागत आहे, तर सोयरीक जुळवणाऱ्यांचे कमिशनही मोठे आहे. यातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले असून, अद्याप पोलिसांत नोंद झाली नाही.
तालुक्यातील ग्रामीण भागात मुलांची संख्या अधिक आहे. शिवाय खेड्यातल्या मुलींना मुंबई-पुण्यासारख्या शहरातील जोडीदारांचे आकर्षण आहे. तसेच खेड्यातील मुलीही उच्चशिक्षित झाल्यामुळे त्यांना या महानगरात अनुरूप स्थळे मिळत असल्यामुळे गावातील मुलांना नवरी मिळेनाशी झाली आहे. गेल्या काही वर्षांत दुष्काळ, अवर्षण व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पत कमालीची खालावली आहे. याचाही परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांना भोगावा लागत आहे.
आतापर्यंत हुंड्यासाठी तर कधी मानपानासाठी अडून बसणाऱ्या तालेवार बापालाही वधू पित्याचे पाय धरण्याची वेळ आली आहे. ज्या मुलाच्या लग्नाचे वय उलटलेले असे वरबाप सध्या मुलाच्या लग्नाच्या चिंतेत बुडाले असून, यासाठी ते आता मुलीसाठी हुंडा मोजायलासुद्धा तयार झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये मुलीला हुंडा देऊन लग्न जुळवल्याची उदाहरणे समोर येत आहेत. दलालांची तयार होत असलेली साखळी व त्यातून होत असलेली आर्थिक लुबाडणूक चिंताजनक आहे.
लग्न जमवणे आता धंदा
पूर्वीपासून समाजात वधू-वरांची लग्ने जमवणाऱ्या काही व्यक्ती नि:स्वार्थपणे, आवड म्हणून काम करत होत्या. सध्याही काही लोकांनी तो प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र, काही लोकांनी वधू-वर सूचक मंडळाच्या नावाखाली त्याचा बाजार मांडला आहे. ही तथाकथित मंडळे नाव नोंदणीच्या नावाखाली पाच ते दहा हजार रुपये घेत आहेत. अशा पद्धतीने दलालांची एक साखळी तयार झाली असून, अशिक्षित लोकांची लूट करत आहेत, ही बाब चिंतनीय आहे.
लग्न जुळवण्याच्या बाबतीत फसवणूक झाल्याची तक्रार अद्याप आमच्याकडे दाखल झाली नाही. जर कोणाची आर्थिक फसवणूक झाल्यास योग्य ती कारवाई होईल, असे महेश पाटील (पोलिस निरीक्षक, जामखेड) म्हणाले.





