प्रभात वृत्तसेवा पिंपरी – चाकणमधील तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट सोसायटीमध्ये खोट्या सोन्याच्या अंगठ्या गहाण ठेवून एक लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेतले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. २) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.जब्बार करीम शेख (वय ४०, रा. पडवळ नगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रोहित मिलिंद थोरात (वय २७, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित थोरात हे चाकणमधील तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट सोसायटीच्या चाकण येथील शाखेमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावर काम करीत आहेत. शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी जब्बार याने सोसायटीमध्ये खोट्या सोन्याच्या अंगठ्या गहाण ठेवून एक लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केली. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.