पॅरिस – तुम्ही केलेली कृत्येच तुमच्या भविष्यातील मित्रांची आणि शत्रुंची निवड करत असतात, असे म्हटले जाते. जागतिक पातळीवर दहशतवादाचे नंदनवन ही तयार झालेली प्रतिमा आपल्याला किती मारक ठरणार आहे, याची प्रचिती बहुदा आता पाकिस्तानला यावी. त्याचे निमित्त ठरले आहे, फ्रान्सने पाकिस्तानला मदत करण्यास स्पष्ट शब्दांत दिलेला नकार.
पाकिस्तानने फ्रान्सकडे मिराज फायटर जेट तसेच हवाई संरक्षक प्रणालीसह ऑगस्ट पाणबुडीच्या अपग्रेडेशनासाठी फ्रान्सकडे मदतीची याचना केली होती. मात्र त्यास फ्रान्सने नकार दिला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका व्यंगचित्रामुळे फ्रान्समध्ये मोठे वादळ उठले होते. एका शिक्षकाच्या हत्येच्या घटनेनंतर एका चर्चवरील हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता.
संबंधित व्यंगचित्राच्या संदर्भात इस्लामिक राष्ट्रांनी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र फ्रान्सचे राष्ट्रपती इम्युनल मॅक्रॉन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जोरदार समर्थन केले होते. त्यावरून त्यांच्यावरही कडवट टीका झाली होती. या टीकाकारांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समावेश होता. आता फ्रान्सने पाकिस्तानला दिलेल्या नकाराचे संबंध कुठेतरी या सगळ्या घटनाक्रमाशी जोडले जात आहेत.
दरम्यान, आता केवळ पाकला नकार देउन फ्रान्स थांबला नाही, तर त्यांनी कतारलाही विनंती केली आहे. फायटर जेटवर कोणत्याही पाकिस्तानी वंशाच्या टेक्नीशीयनला काम करू देऊ असे त्यांनी कतारला सांगितले आहे. कारण कतारने जर तसे केले तर तेथून पाकिस्तानला तांत्रिक माहिती लीक होउ शकते अशी भिती फ्रान्सला वाटते आहे.
संबंधित फायटर जेट हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. कारण भारताच्या विरोधातील संघर्षात पाकिस्तान याच जेटचा वापर करतो. या जेटशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तान चीनलाही पुरवत असतो. सध्या भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सुरक्षेला त्यामुळे धोका निर्माण होउ शकतो.
गेल्या काही काळात फ्रान्स आणि भारत यांच्यात घट्ट संबंध प्रस्थापित झाले आहेत. पाकला नकार देउन फ्रान्स त्या मैत्रीला जागला आहे, असेच म्हणता येउ शकते.