Share Market: परकीय गुंतवणुकदारांनी 3 दिवसात केली तब्बल 4 हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री, नक्की कारण काय?

FPI selling Indian equities: गेल्याकाही महिन्यात भारतीय शेअर मार्केटमध्ये समिश्र स्थिती पाहायला मिळत आहे. मागील 2 महिन्यांपासून मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार दिसत आहेत. त्यातच आता परकीय पोर्टफोलियो गुंतवणुकदारांनी (FPI) मोठे पाऊल उचलले आहे. परकीय गुंतवणुकदारांनी मागील 3 ट्रेडिंग सत्रामध्ये भारतीय शेअर मार्केटमधून 4285 कोटी रुपये काढले आहेत. याआधी डिसेंबरमध्ये FPIने मार्केटमध्ये 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील आव्हानांमुळे परकीय गुंतवणूकदार मार्केटमधून मागे हटताना दिसत आहे. अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे, तर रुपयाच्या मुल्यात घसरण सुरू आहे. याशिवाय, अमेरिकन बाँडमधून जास्त परतावा मिळत राहील, तोपर्यंत परकीय गुंतवणुकदारांचा मार्केटमधून पैसे काढण्याचा कल सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक स्तरावरील स्थिती पाहता परकीय गुंतवणुकदार सतर्क झाले आहेत. वर्ष 2024 मध्ये परकीय गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर्समध्ये केवळ 427 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. 2023 मध्ये गुंतवणुकीचा आकडा 1.71 लाख कोटी रुपये होती. तर वर्ष 2022 मध्ये एफपीआयने 1.21 लाख कोटी रुपये काढून घेतले होते.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेली घसरण हे परकीय गुंतवणुकदारांच्या या भूमिकेमागचे मुख्य कारण आहे. याशिवाय, अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून यावर्षी व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी आहे, ज्याचा परिणामही दिसून येत आहे. परकीय गुंतवणुकदारांनी पुढेही विक्री सुरू ठेवल्यास शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात.





