मोटार कार व टेम्पोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार

नेवासा : नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा जवळ मोटार कार व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एक महिला जखमी झाली आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
रविवारी दि. 11 रोजी सकाळी साडे नऊ – दहा वाजेच्या सुमारास अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असलेल्या मोटार कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर मोटार कार क्रमांक (एमएच 14.एस सी.9007)धडकून समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक (एमएच 48 टी 5319) ला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की जागेवर तिघांचा मृत्यू झाला तर एकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
मृतांमध्ये सर्व पुरुष असून एक महिला जखमी असून त्यांच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात राहुल परमेश्वर शर्मा (वय 27 वर्ष रा.कलंदी गोल्ड सिटी इंदोर), हर्ष मनोहर शर्मा (वय 18 रा. रतलाम, मध्यप्रदेश), योगेश परमेश्वर शर्मा (वय 24 वर्ष रा. कुंडली जिल्हा धार, मध्यप्रदेश), अविनाश मंडलेचा (वय 25 वर्ष रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा जि.अहमदनगर) हे मयत झाले आहेत.
तर राणू परमेश्वर शर्मा (वय 26 वर्ष रा. गोल्ड सिटी इंदोर), ही महिला जखमी झाली असून त्यांच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी सांगितले. इंदौर येथील भाविक देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला असल्याची माहिती रामचंद्र कर्पे यांनी दिली. अपघाताची माहिती समजताच रामचंद्र कर्पे, पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळवे, गुलाब मोकाटे, रमेश लबडे यांनी घटनास्थळी भेट देवून अपघातातील मृतांची मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून महामार्गावरील वाहतूक सुरुळीत केली.





