वेल्हे -वडगाव झांजे (ता. वेल्हे) परिसरातील आणखी चार जण शनिवारी (दि. 17) करोना पॉझिटिव्ह आढले आहेत. त्यामुळे वडगाव झांजेमध्ये आता करोनाचे एकूण रुग्ण 14 झाले आहेत. तर आणखी 30 जणांना पुण्यात नेण्यात आले असून त्यांचे अहवाल येणे बाकी असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. वडगाव झांजे परिसरात शनिवारी (दि. 9) करोनाचा रुग्ण आढळल्यानंतर शनिवार (दि. 16) या आठ दिवसांच्या कालावधीत 14 जणांना करोनाची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. तर करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे. करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शिक्के मारून गृह विलगीकरण करून वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येत आहे. या ठिकाणी नियमित तपासणी सुरू आहे. तर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. वडगाव झांजे करोनाचे केंद्रस्थान मानून तीन किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून करण्यात आले असून पाच किमीचा भाग बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहेत. परिसरातील गावांमध्ये कोणाला काही लक्षणे आढळल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वेल्हे तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या 23 वर पोहोचली असून, त्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ व्यक्तींनी करोनावर मात केली आहे.