Pune District : चाकण-तळेगावच्या कोंडीवर चार मिसिंग लिंक
Pune District : या मार्गांसाठी विकास आराखड्यात आवश्यक आरक्षणे करण्यात आली आहेत. भूसंपादन, अतिक्रमण निर्मूलन आणि विविध विभागांमधील समन्वयाची प्रक्रिया सुरू आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चारही मार्गांची कामे वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे.

चाकण : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि अपघातांच्या वाढत्या घटनांवर उपाय म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चाकण परिसरात चार महत्त्वाचे पर्यायी जोडरस्ते अर्थात ‘मिसिंग लिंक’ विकसित करण्याचे नियोजन केले आहे. सुमारे 261 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमुळे पुणे-नाशिक महामार्गासह चाकण-तळेगाव आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख चौकांमध्ये सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, अनेकदा वाहनचालकांना दीड ते दोन तास कोंडीत अडकून पडावे लागते. अवजड वाहनांसाठी वेळेचे निर्बंध, अतिक्रमणांवर कारवाई, बसथांबे व रिक्षा थांब्यांचे स्थलांतर अशा उपाययोजना करूनही तळेगाव चौक, आंबेठाण चौक आणि आळंदी फाटा परिसरातील वाहतूक कोंडी कायम आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांची गरज अधिक तीव्र झाली आहे.
या मार्गांसाठी विकास आराखड्यात आवश्यक आरक्षणे करण्यात आली आहेत. भूसंपादन, अतिक्रमण निर्मूलन आणि विविध विभागांमधील समन्वयाची प्रक्रिया सुरू आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चारही मार्गांची कामे वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, भूसंपादन आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे काही कामे रखडल्याने संबंधित विभागांनी ही कामे गतीने मार्गी लावण्याची गरज आहे. चाकण नगरपरिषदेनेही वाकी-तळेगावसाठी 45 मीटर रुंद, तर वाकी-शिक्रापूरसाठी 30 मीटर रुंद रस्ता विकसित करण्याची मागणी केली आहे.
या चार मार्गांचा पर्याय
हिंगणे चौक-फोक्सवॅगन कंपनी, खराबवाडी : चाकण एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक तीनला जोडणारा सुमारे 900 मीटर लांबीचा आणि 30 मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे.
नाणेकरवाडी-पुणे-नाशिक महामार्ग : सॅनी कंपनीपासून समृद्धी सीएनजी पंपापर्यंत सुमारे 1.2 किलोमीटर लांबीचा आणि 15 मीटर रुंदीचा जोडरस्ता विकसित करण्यात येणार आहे.
मेदनकरवाडी-रासे फाटा : बंगला वस्ती चौकापासून रासे फाट्यापर्यंत सुमारे 2.5 किलोमीटर लांबीचा आणि 36 मीटर रुंदीचा मार्ग प्रस्तावित आहे.
पश्चिम बाह्यवळणाचा महत्त्वाचा टप्पा
पुणे-नाशिक महामार्ग आणि चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक पाच यांना जोडणारा सुमारे 850 मीटर लांबीचा आणि 60 मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. पुढे तळेगाव एमआयडीसीला जुन्या मुंबई-पुणे महामार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
चाकणच्या मुख्य बाह्यवळणालाही गती
चाकण-शिक्रापूर आणि चाकण-तळेगाव मार्गांना पुणे-नाशिक महामार्गाशी थेट जोडणार्या मुख्य बाह्यवळण मार्गासाठी चाकणलगतच्या चार गावांतील सुमारे 40 एकर जमीन आवश्यक असल्याचे प्राथमिक नियोजन आहे. हा मार्ग झाल्यास कंटेनर आणि अवजड वाहने चाकण शहरात न शिरता थेट प्रमुख महामार्गांकडे वळविता येणार आहेत.
53 किलोमीटरच्या उन्नत मार्गालाही गती
तळेगाव-चाकण-शिक्रापूर या सुमारे 53 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गालाही राज्य सरकारने पुढे नेले आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्ग, चाकण औद्योगिक पट्टा आणि पुणे-अहिल्यानगर मार्ग यांच्यातील मालवाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, उन्नत मार्ग पूर्ण होण्यासाठी काही वर्षे लागण्याची शक्यता असल्याने चार ‘मिसिंग लिंक’ आणि मुख्य बाह्यवळण हे तातडीने दिलासा देणारे प्रकल्प ठरणार आहेत.
एमआयडीसीची 437 कोटींची स्वतंत्र कामे
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्वतंत्रपणे सुमारे 437 कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये चाकणच्या विविध औद्योगिक टप्प्यांतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, चार व सहापदरी रस्ते, सेवा रस्ते तसेच तळवडे माहिती-तंत्रज्ञान उद्यान-चाकण जोडरस्त्याचा समावेश आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला तळेगाव-चाकणमार्गे पुणे-नाशिक महामार्गाशी जोडण्याचेही नियोजन आहे.





