गडचिरोली – बस आणि पिकअपची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्लीजवळील चंदनखेडी फाट्यावर रविवारी झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
पिकअप चालक साईरामकृष्ण सूर्यदेवरा (रा. तलाडा, जि. खम्मम, तेलंगणा), देवाजी खोकले (रा. आवडगाव, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर), नैना निकुरे (रा. आवडगाव), अर्चना आवारी (रा. हडदा, ता. ब्रम्हपुरी) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातून मिरची तोडणाऱ्या मजुरांना घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीकडे जाणारे पिकअप आणि भंडाऱ्याहून अहेरीकडे प्रवाशांना घेऊन जाणारी बस यांच्यात चौडमपल्लीजवळील चंदनखेडी फाट्यावर समोरासमोर धडक झाली. या धडकेत पिकअप मधील चौघांचा मृत्यू झाला आहे.