दक्षिण नेपाळमधील अपघातात चार भारतीय ठार
Updated On:

काठमांडु, – दक्षिण नेपाळ मधील रौताहत जिल्ह्यात एक प्रवासी वाहन तळ्यात पडून झालेल्या अपघातात चार भारतीय ठार झाल्याची घटना घडली आहे. या गाडीचा चालक आणि प्रवासी मद्याच्या धुंदीत असताना हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा कयास आहे.
ठार झालेले सर्व जण बिहारचे रहिवासी असून त्यांची ओळख पटली आहे. गौर-चंद्रपुर रस्त्यावर हे तळे आहे. तेथून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ते वाहन तळ्यात पडले. ठार झालेल्या इसमांकडे असलेल्या आधार कार्डामुळे त्यांची ओळख पटू शकली.
नेपाळ पोलिसांनी या बाबतची माहिती भारतीय पोलिसांना दिली आहे. त्यानुसार मृतांचे नातेवाईत तिकडे पोहचले असून आज सकाळी त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

