जामखेड -लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी कालिका पोदर इंटरनॅशनल लर्न स्कूलने लर्न फ्रॉम होम उपक्रम सुरू केले आहे. ऑनलाईन पद्धतीने ही शाळा विद्यार्थ्यांना घरीच शिक्षण देत आहे. या शाळेने आगामी शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रमच सुरू केला आहे. घरी असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक ऑनलाईन मार्गदर्शन करतात. यासाठी व्हर्च्युअल स्कूल हा उपक्रम सुरू केला आहे. नवीन विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन प्रवेश देऊन त्याच दिवसापासून त्यांना वर्गात समाविष्ट करून घेण्यात येत आहे.
शहरातील कालिका पोदर लर्न स्कूलमध्ये नर्सरी ते सातवीपर्यंतच्या या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ग्रुप करून तसेच मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाच्या साह्याने झूम ऍपच्या माध्यमातून दररोज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नियमित वर्ग भरवून विद्यार्थ्यांना लाईव्ह शिक्षण दिले जात आहे. यात विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केले. त्याद्वारे त्यांना माहिती, अभ्यासाविषयी सूचना, गृहपाठ दिला जातो. वेळापत्रकाप्रमाणे वर्ग घेतले जातात.
त्यासाठी सर्व शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले असून, वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक ऑनलाईन लेक्चर देऊन ग्रुपच्या माध्यमातून होमवर्क देखील करून घेत आहेत. शिक्षक घरी बसून स्मार्ट फोन, स्कूलच्या वेबसाईडद्वारे अध्यापन करतात. प्रत्येक विषयाचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार विषयनिहाय सकाळी दहा वाजता ऑनलाइन वर्ग सुरू होतो. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना नवीन अभ्यास देऊन तो त्यांच्याकडूनपूर्ण करून घेतला जातो.
अभ्यासाचे फोटो, ऑडिओ, व्हिडिओ काढून व्हॉट्स ऍपमधून शिक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. शिक्षकही विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास तपासून योग्य रिमार्क देतात. विद्यार्थ्यांशी वैयक्तिक पातळीवर संपर्क करून देखील अभ्यासाच्या समस्या सोडवल्या जात आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर कला, हस्तकला, गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जात आहे. योग आणि पिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती शाळेचे प्राचार्य मानवेंद्र कोनांगो यांनी दिली.