पिंपरी – गरोदर महिला, नवजात शिशू आणि प्रसूत माता यांचा मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारन सुरू केलेल्या लक्ष्य योजनेचे निकष पूर्ण करत महापालिकेच्या चार रुग्णालयांनी राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. केंद्र शासनाद्वारे प्रसुतीगृह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम लक्ष्य राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत रुग्णालयामधील प्रसुतीगृह व शस्त्रक्रिया गृह यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्याचा मानस आहे. जेणेकरुन गरोदर माता, प्रसूत माता व नवजात शिशु यांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारता येईल. यासाठी देशातील मातामृत्यू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने लक्ष्य ह उपक्रम सुरू केला आहे. पालिका रूग्णालयातील प्रसुतीकक्ष आणि प्रसुती शस्त्रक्रिया विभागामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची गुणवत्ता सुधारावी, प्रसुतीदरम्यान, प्रसुतीनंतर स्त्रीला सन्मानपूर्वक व उच्च दर्जाची मातृत्व काळजी प्रदान केली जावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. लक्ष्य या उपक्रमांतर्गत पालिकेच्या भोसरी रुग्णालयातील प्रसुतीकक्ष आणि प्रसुती शस्त्रक्रिया विभागाला केंद्रस्तरीय पथकाने निरीक्षण केल्यानंतर राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक गुणवत्ता प्रमाणपत्र मागील वर्षीच प्राप्त झालेले आहे. लक्ष्य या उपक्रमांतर्गत नवीन थेरगांव रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) रुग्णालय व नवीन जिजामाता रुग्णालयाचे शासन मार्गदर्शक सुचनांप्रमाणे राज्यस्तरीय निरीक्षकांच्या पथकाव्दारे नोव्हेंबर 2022 व डिसेंबर 2022 यामध्ये निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाच्या मानांकानुसार 9 मे राज्यस्तरीय प्रमाणपत्र महापालिकेच्या थेरगांव रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय व नवीन जिजामाता रुग्णालय देण्यात आलेले आहे. तसेच कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल आकुर्डी रुग्णालयांचे देखील केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी केंद्रस्तरीय पथकाव्दारे माहे मार्च 2023 मध्ये निरीक्षण करण्यात आले असून त्याचा निकाल आला नाही. केंद्र शासनाव्दारे प्रसुतीगृह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम “लक्ष्य” राबविण्यात येतो. लक्ष्यअंतर्गत प्राप्त राज्यस्तरीय प्रमाणपत्राच्या आधारावर चार रुग्णालयांना केंद्र शासन स्तरावरील राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वैद्यकीय विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. – डॉ. पवन साळवे,आरोग्य वैद्यकीय अधिकारी