पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकणजवळील कडाचीवाडी (ता. खेड) येथील पाझर तलावात शनिवारी (३१ मे) दुपारी १३ वर्षांच्या चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मेदनकरवाडी परिसरातील असून, मृत्यूमुखी पडलेली सर्व मुले स्थलांतरित कामगारांची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे संपूर्ण मेदनकरवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. ओमकार बाबासाहेब हांगे (वय १३, सध्या रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. मस्साजोग, ता. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, खंडोबा मंदिराच्या मागे, मूळ रा. धनवडी, ता. वरुड, जि. अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, बोरजाईनगर, मूळ रा. अंबुलगा, ता. मुखेड, जि. नांदेड), नैतिक गोपाळ मोरे (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मार्तंडनगर, ता. खेड, मूळ रा. झरी बाजार, ता. अकोट, जि. अकोला) अशी अशी बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सर्व मुले मेदनकरवाडी येथे भाड्याच्या घरांमध्ये राहत होती आणि स्थानिक शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. शनिवारी सकाळी ११ वाजता ही मुले पोहण्यासाठी तलावाकडे गेली होती. दुपारीपर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. तलावाच्या काठावर मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या आणि आपत्ती मित्रांच्या मदतीने पोलिसांनी तलावात शोधमोहीम राबवून चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. चाकण पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मेदनकरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मुलांच्या कुटुंबीयांनी आक्रोश करत हंबरडा फोडला. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ही घटना पालकांसाठी आणि स्थानिक प्रशासनासाठी एक गंभीर इशारा आहे. अशा प्रकारच्या दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी जलाशयांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.