महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे निधन

पुणे – अमेरिकेत राहून मराठी संस्कृती फुलवण्यात मोठे योगदान देणारे महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे.
सांगलीहून अमेरिका गाठल्यानंतर कर्तृत्व गाजवणारा चेहरा अशी देशमुख यांची ओळख होती. सत्तरच्या दशकात अमेरिकेत गेलेल्या तरुणांमध्ये देशमुख यांचे नाव प्रामुख्याने घेतले गेले. सांगली ते फ्लोरिडा असा त्यांच्या प्रवासाचा आलेख हा उत्तरोत्तर यशाच्या शिखरावर जाणारा आहे.
मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचे ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशनला एक कोटी रुपयांची देणगी देऊन सन 1994 पासून महाराष्ट्र फाउंडेशनचे मराठी साहित्य पुरस्कार ही योजना सुरू केली. फाउंडेशनच्या वतीने सन 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार तर सन 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार प्रदान करण्यात येतात. गेली 28 वर्षे पुरस्कार दिले जात आहेत.
देशमुख हे मूळचे सांगलीचे. सन 1964 मध्ये एसएससी परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी या विभागातून बी. केम. ही पदवी घेऊन पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तेथे एम. एस. (केमिकल इंजिनिअरिंग), एम. बी. ए. या पदव्यांबरोबरच जे. डी. ही कायद्याची पदवीही त्यांनी मिळवली. अमेरिकेत वकिली करण्याचा परवानाही त्यांनी प्राप्त केला. नंतर अमेरिकेतच “कमॉडिटी ट्रेडर’ म्हणून वॉल स्ट्रीटवर त्यांनी अनेक वर्षे यशस्वी व्यवसाय केला.
देशमुख हे अमेरिकेमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्वांत जुन्या “सियारा क्लब’ या संस्थेचे सक्रिय सभासद होते. या क्लबमार्फत भारतामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थांना एक लाख डॉलर्सचा पुरस्कार देण्याच्या योजनेचे ते शिल्पकार होते. तसेच त्यासाठी करावयाच्या निधी संकलन समितीचे प्रमुख होते. महिला सक्षमीकरणासाठी अमेरिकेत केलेल्या कामाबद्दल त्यांना न्यूयॉर्कमधील “टाइम स्क्वेअर’मध्ये हिलरी क्लिंटन यांच्यासमवेत “फुल वीक सॅल्यूट’चा सन्मान देशमुख यांना मिळाला होता.

