पुणे | शिक्षण, उद्योग, नैतिकतेवर भविष्याचा पाया

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षित तरुण पिढीच्या भविष्याचा पाया हा शिक्षण, उद्योग आणि नैतिकता यावर आधारित असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक डॉ. अभय फिरोदिया यांनी केले. ते विश्वकर्मा विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अगरवाल, विद्यापीठाचे उपाध्यक्ष डाॅ. वासुदेव गाडे, विद्यापीठाचे संचालक मंडळाचे सदस्य बजरंगदास लोहिया, कुलगुरू डाॅ. सिद्धार्थ जबडे, विद्यापीठाचे विविध शाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डाॅ. फिरोदिया म्हणाले, शिक्षण, उद्योग आणि नैतिकता हा तुमच्या भविष्याचा पाया आहे.
शिक्षण हा तुमच्या प्रवासाचा आरंभबिंदू असला तरी, यशस्वी जीवनासाठी उद्योग आणि नैतिकतेचा अंगीकार करणे महत्त्वाचे आहे,. तरुणांनी भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा आणि ती कायम टिकून राहील याचा आत्मविश्वास बाळगावा.
भरत अगरवाल यांनी विद्यार्थ्यांना आपल्या नात्यांचा सन्मान आणि संवाद राखण्याचे आणि जीवनात उपयोगी पडेल, अशी एक बांधिलकी तयार करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. मागील वर्षातील विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा कुलगुरू डाॅ. जबडे यांनी घेतला. या समारंभात एकूण ८२८ विद्यार्थ्यांना पदवी आणि पीएच.डी. देण्यात आल्या.





