मंगळवेढा (सोलापूर) : भारतीय जनता पक्षात तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्हा भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण. तब्बल ३२ वर्षे पक्षासाठी झोकून देऊन काम केल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले आणि आता वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आलिशान टोयोटा फोर्च्युनर गाडी भेट देऊन त्यांचा सन्मान द्विगुणित केला. हा कार्यक्रम राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. ७ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा शहरातील सांगोला नाका येथे शशिकांत चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फोर्ट्युनर गाडीची चावी चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली. यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, उद्योजक शंकर जाधव, तालुकाध्यक्ष आंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दिगंबर यादव, सत्यजित सुरवसे, युवा मोर्चाचे सुदर्शन यादव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शशिकांत चव्हाण यांची पक्षातील वाटचाल प्रेरणादायी आहे. १९९२ पासून भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांनी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सहा वर्षे तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष (३ वर्षे), जिल्हा सरचिटणीस (३ वर्षे), जिल्हा संघटन सरचिटणीस (३ वर्षे) अशी पदे भूषवली. अखेर नुकतीच त्यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. पक्ष सत्तेत असतानाच हे पद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ‘भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष’ : शशिकांत चव्हाण वाढदिवसानिमित्त संपर्क कार्यालयात दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी होती. चव्हाण म्हणाले, “भाजप हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कोणताही कार्यकर्ता मोठ्या पदाचे स्वप्न पाहू शकतो. पक्षाने माझ्या ३२ वर्षांच्या निष्ठेला जिल्हाध्यक्षपद देऊन सन्मान दिला. कार्यकर्त्यांच्या या प्रेमळ भेटीमुळे पक्षासाठी आणखी जोमाने काम करण्याची ताकद मिळाली.” हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असून, भाजपच्या कार्यकर्ताप्रेमाची राज्यभर चर्चा रंगली आहे. महायुती सरकारमध्ये पक्षाची ताकद वाढत असतानाच असे सन्मान कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत.