नेत्यांमधील वादाला गँगवॉरचे स्वरुप, भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; व्हीडिओ व्हायरल

Uttarakhand News: उत्तराखंड राज्यातील हरिद्वारमध्ये दोन नेत्यातील वादाचे रुपांतर गँगवारमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. हरिद्वार येथील खानपूर विधानसभेतील विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला की दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली. भाजपचे माजी आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी विद्यमान अपक्ष आमदार उमेश कुमार यांच्या संपर्क कार्यालयावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.
कुंवर प्रणव यांनी कुमार यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन गोळीबार केला असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांना अटक केली आहे. याशिवाय, या प्रकरणात आमदार उमेश कुमार यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
एकेकाळी पत्रकार असलेले उमेश कुमार हे 2022 मध्ये उत्तराखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीत त्यांनी खानपूर मतदारसंघातून चॅम्पियन यांची पत्नी कुंवरानी देवयानी यांचा पराभव केला होता. तेव्हापासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू होता.
Video 1: Former MLA Kunwar Pranav Singh Champion opens fire at the residence of #Khanpur constituency MLA Umesh Kumar in broad daylight.
Video 2: Following reports of firing and assault at his residence, Khanpur MLA Umesh Kumar, enraged, rushes to confront former… pic.twitter.com/dYPW51jY8D
— KHABAR EXPRESS (@Khabarexpress11) January 26, 2025
दोन्ही नेते मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरूनही एकमेकांवर टीका करत होते. वाद एवढा वाढला की चॅम्पियन हे त्यांच्या समर्थकांसह थेट कुमार यांच्या कॅम्प कार्यालयात पोहोचले. येथे दोन्ही नेत्यांच्या समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी चॅम्पियन यांच्याकडून हवेत गोळीबार देखील करण्यात आला. घटनेत 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार करतानाचे त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. या घटनेनंतर त्या भागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी माहिती दिली की, माजी आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी हवेत गोळीबार केल्याने भागात दहशत निर्माण झाली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याप्रकरणी चॅम्पियन यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आमदार उमेश कुमार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, दोघांचेही शस्त्र परवाने रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.





