वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील अतिशय ताकदवान नेत्यांपैकी एक समजले जाणारे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचे आज सोमवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. न्युमोनियामुळे हृदय आणि श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबियांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. डिक चेनी अनेक दशकांपासून देशसेवेमध्ये सक्रिय होते. व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ, व्योमिंगचे कॉंग्रेस सदस्य, संरक्षण मंत्री आणि उपाध्यक्ष आदी महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले होते. आखाती युद्धाच्यावेळी तत्कालिन अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या कारकिर्दीमध्ये संरक्षण मंत्री असताना अमेरिकेने इराकवर हल्ला करण्याचा निर्णय हा डिक चेनी यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा निर्णय समजला जातो. बुश यांचे चिरंजीव जॉर्ज डब्लू बुश यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ते देशाचे उपाध्यक्ष बनले होते. आपल्या स्वतःच्या प्रतिमेपेक्षा जॉर्ज डब्लू बुश यांच्या अध्यक्षीय निर्णयांना विशेष महत्व दिल्याने बुश प्रशासनेचे पडद्यामागील खरे सूत्रधार डिक चेनी हेच होते. न्यूयॉर्कवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणेला अधिक सक्षम बनवण्याबरोबर टेहळणी, संशयितांना ताब्यात घेऊन तपास आणि आधुनिक तंत्राच्या आधारे गुप्तचरांचे काम करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. राजकीय जीवनातून निवृत्त झाल्यानंतर चेनी हे डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे टीकाकार बनले. ट्रम्प यांनी सत्तेत राहण्यासाठी केलेल्या हट्टावर आणि यूएस कॅपिटलवर केलेल्या हल्ल्यावरही त्यांनी कडवट टीका केली होती. स्वतः आयुष्यभर रिपब्लिकन असतानाही डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना आपण मतदान करणार असल्याचे त्यांनी म्हटल्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. चेनी यांना दीर्घकाळ हृदयविकाराचा त्रास होता. वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराच्या झटका आला. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांचे हृदय प्रत्यारोपण झाले होते.